For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपती मुर्मूंना फिजीचा सर्वोच्च पुरस्कार

06:55 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपती मुर्मूंना फिजीचा सर्वोच्च पुरस्कार
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला आहे. फिजीचे राष्ट्रपती रतू विटीयामे मैवालीली काटोनिव्हेयर यांनी हा पुरस्कार त्यांना मंगळवारी एका शानदार समारंभात प्रदान केला. या पुरस्कारासाठी राष्ट्रपती मुर्मू यांनी फिजीचे आभार मानले असून दोन्ही देशांमधील प्रगाढ मैत्रीचाही आपल्या आभाराच्या संदेशात उल्लेख केला आहे.

‘ऑर्डर ऑफ फिजी’ अशी या पुरस्काराची संज्ञा असून हा पुरस्कार भारताच्या भारतरत्न या पुरस्काराप्रमाणे आहे. आपल्याला मिळालेला हा पुरस्कार हे दोन्ही देशांच्या अभेद्य मैत्रीसंबंधाचे द्योतक आहे. दोन्ही देशांची मैत्री समान आणि सामायिक मूल्यांवर आधारित असून ती उत्तरोत्तर अधिक बळकट होत जाईल. फिजीची संस्कृती आणि जीवनशैली समृद्ध आहे. या संस्कृतीत परंपरा आणि प्राचीनतेला महत्त्व आणि सन्मान दिला जातो. या देशातील वातावरणही बहुसांस्कृतिक आणि मुक्त असून सध्याच्या संघर्षमय जगासाठी हा एक मोठा आदर्श आहे. फिजीपासून जगाला बरेच काही शिकण्यासारखे आहे, अशी प्रशंसा द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात केली.

Advertisement

सुवा येथे कार्यक्रम

फिजीची राजधानी सुवा येथे पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत आणि फिजी यांच्यातील संबंध 145 वर्षे जुने आहेत. साधारणत: दीडशे वर्षांपूर्वी भारतातील शेतमजुरांना ब्रिटिशांनी फिजी येथे उसाच्या आणि इतर कृषी उत्पादनांच्या शेतांवर काम करण्यासाठी आणले होते. आता या शेतमजुरांच्या पुढच्या पिढ्या या देशातच स्थायिक झाल्या असून या देशाच्या समृद्धीमध्ये त्यांनी भर घातली आहे. स्थानिक मूळ रहिवाशांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. या भारतवंशीयांच्या माध्यमातून दोन्ही देश निकट आले आहेत.

मुर्मूंचे भव्य स्वागत

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भव्य स्वागत फिजीच्या अध्यक्षांनी त्यांच्या या देशातील आगमनानंतर केले. नंतर दोन्ही नेत्यांनी परस्परसंबंध अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. भारताने फिजीमध्ये काही प्रकल्प स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. यांमध्ये काही वीजप्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केले जातील, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.