लढवय्या जोकोविचची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार
असह्या वेदनामुळे जोकोविचने उपांत्य फेरीचा सामना सोडला अर्धवट : जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह फायनलमध्ये
वृत्तसंस्था/ मेलबर्न
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हॅक जोकोविचने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतील सामन्यातून माघार घेतली. जोकोविचने माघार घेतल्याने त्याचा प्रतिस्पर्धी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हला वॉकओव्हर मिळाला आणि तो प्रथमच या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला. आता, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या इटलीच्या जेनिक सिनेर व अलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यात ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमची फायनल होईल.
ऑलिम्पिक चॅम्पियन जोकोविचने बुधवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पिछाडीवर पडून पराभव केला होता. अल्कारेजविरुद्ध लढतीत तो मांडीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. अशा परिस्थितीतही त्याने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना उपांत्य फेरी गाठली होती.
सेमीफायनलमधून माघार
शुक्रवारी उपांत्य फेरीचा सामना जोकोविच व अलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यात झाला. मांडीला पट्टी बांधून कोर्टवर उतरलेल्या जोकोविचला पहिला सेट 7-6 अशा फरकाने गमवावा लागला. दुसऱ्या सेटदरम्यान त्याला वेदना असह्या झाल्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अर्थातच हा निर्णय अतिशय धक्कादाय होता. सर्बियाच्या या दिग्गज खेळाडूने याआधी दहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेत्यांचा मान मिळवला असून यंदाही जोकोविचला स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट मानले जात होते. पण आता जोकोविचच्या माघारीमुळे जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने प्रथमच मेलबर्नमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. जोकोविच उपांत्य फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडून मैदानाबाहेर पडल्यामुळे आता एकीकडे व्हेरेव्ह अंतिम सामन्यात पोहोचला आणि त्याला पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी मिळाली आहे.
सामन्यातून माघार घेतल्यानंतर जोकोविच म्हणाला की, मी स्नायूंच्या दुखापतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु पहिला सेट संपल्यानंतर मला आणखी वेदना जाणवू लागल्या आणि ते हाताळणे खूप कठीण झाले. जोकोविचने माघार घेतल्यानंतर रॉड लेव्हर एरिना येथे उपस्थित प्रेक्षकांनी जोकोविचविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यानंतर व्हेरेव्हने त्याचा बचाव केला. व्हेरेव्ह म्हणाला की, दुखापतीमुळे बाहेर गेल्यास कोणत्याही खेळाडूला चिडवू नका. मला माहित आहे की प्रत्येकजण तिकिटांसाठी पैसे देतो, परंतु नोव्हॅकने गेल्या 20 वर्षांमध्ये खेळासाठी सर्व काही दिले आहे. जोकोविचच्या निर्णयाचा सन्मान करा, असे आवाहन त्याने प्रेक्षकांना केले.
इटलीचा सिनेर अंतिम फेरीत
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या सिनेरने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 7-6, 6-2, 6-2 असा धुव्वा उडवला. या विजयासह सलग दुसऱ्यांदा सिनेरने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमची फायनल गाठली आहे. शेल्टनविरुद्ध लढतीत त्याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, जेतेपदासाठी त्याची लढत जर्मनीच्या व्हेरेव्हविरुद्ध होईल.
महिला एकेरीत साबालेन्का व कीज यांच्यात जेतेपदासाठी लढत
गतविजेती आर्यना साबालेन्का ऑस्ट्रेलियन ओपन 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. साबालेन्काने सलग तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली. 25 जानेवारीला होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत तिचा सामना अमेरिकेच्या मॅडिसन कीजशी होणार आहे.
कारकिर्दीतील 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले
37 वर्षीय जोकोविचने कारकिर्दीत 24 वेळा ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया केली आहे. जागतिक टेनिस विश्वात सर्वाधिक ग्रँडस्लॅम मिळवणारा तो खेळाडू आहे. यंदाही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तो 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न घेऊन कोर्टवर उतरला होता, पण दुखापतीमुळे त्याचे हे स्वप्न भंगले आहे.