पत्नी-मेहुण्याशी भांडण; युवकाची गळा कापून आत्महत्या
होन्नियाळ येथील थरकाप उडविणारा प्रकार
बेळगाव : होन्नियाळ (ता. बेळगाव) येथील एका युवकाने नशेत विळ्याने स्वत:चा गळा कापून घेऊन आपले जीवन संपविले आहे. यासंबंधी त्याच्या मेहुण्यावर मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. परशुराम मल्लाप्पा कटबुगोळ (वय 35) असे त्याचे नाव आहे. परशुरामला दारूचे व्यसन जडले होते. याच मुद्द्यावर पती-पत्नीचे भांडण होत होते. घरातील सामान विकून तो व्यसन करीत होता. दारूसाठी घरातील तांदूळ विकल्यावरून पत्नीबरोबर गुरुवारी त्याचे भांडण झाले. ही गोष्ट परशुरामच्या पत्नीने आपल्या भावाला कळवली.
शुक्रवारी परशुरामचा मेहुणा मल्लिकार्जुन शंकऱ्याप्पा बडकप्पन्नावर, राहणार मबनूर, ता. सौंदत्ती हा होन्नियाळला आला. बहिणीशी भांडण का केलास? अशी विचारणा करीत ढोल वाजविण्याच्या काठीने परशुरामला मारहाण केली. त्यानंतर परशुरामने घरातील विळा घेऊन आपण आत्महत्या करू, असे सांगत पत्नी व मेहुण्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मल्लिकार्जुनने तुला मरायचे असेल तर मर, असे सांगितल्यामुळे विळ्याने गळ्यावर वार करून घेऊन त्याने आपले जीवन संपविले. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक पुढील तपास करीत आहेत.