वक्फ बोर्ड विरोधात आता एकीने लढा द्या!
काडसिद्धेश्वर स्वामीजींचा घणाघात : नागरिक हितरक्षण समितीतर्फे सभेचे आयोजन
बेळगाव : वक्फ बोर्डमुळे देशातील उद्योग, मठ, मंदिरांच्या जमिनी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. यापूर्वी केवळ आपण ऐकून होतो, परंतु आता बेळगावच्या फुलबाग गल्ली, आनंदवाडी, भांदूर गल्ली, कोनवाळ गल्ली येथील नागरिकांना नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वक्फ बोर्ड विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत वक्फ बोर्डची पाठराखण करणाऱ्या कर्नाटक सरकारनेही आता नोंदी मागे घेण्यास सांगितले आहे. हे झाले फक्त हिंदू धर्मियांच्या एकीमुळे, त्यामुळे यापुढेही हीच एकी अबाधित राहिल्यास वक्फ बोर्डही रद्द होईल, असे घणाघाती विचार कोल्हापूर येथील कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मांडले. नागरिक हितरक्षण समितीच्यावतीने मंगळवारी वक्फ बोर्ड विरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यानात झालेल्या या जाहीर सभेमध्ये काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वक्फ बोर्ड विरोधात आपली जहाल भूमिका मांडली. यावेळी बेळगाव परिसरातील अनेक मठांचे मठाधीश व्यासपीठावर उपस्थित होते. स्वामीजींनी वक्फ बोर्डच्या विरोधासोबतच कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद यांच्यावरही नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
कोणत्याही जमिनीवर हक्क दाखविण्याचा प्रयत्न
वक्फ बोर्डने एखाद्या जमिनीवर दावा सांगितल्यास त्याविरोधात न्यायालयातही दाद मागता येत नाही. ती जमीन आपलीच कशी आहे, हे शेतकऱ्याला वक्फ बोर्डसमोर सिद्ध करावे लागते. सध्याच्या घडीला देशात 9 लाख 40 हजार स्थावर मालमत्ता या वक्फच्या अधिपत्याखाली आहेत. तर तब्बल 38 लाख एकर जमीन वक्फच्या ताब्यात आहे. त्यामुळे यापुढे तरी गप्प बसून चालणार नाही. या जमिनींचा वापर आता रोहिंग्यांना वसविण्यासाठी होणार असल्याने आतापासूनच विरोध करणे गरजेचे आहे.
हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांनी वक्फ बोर्डच्या नोंदींवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राजकीय पक्षांपेक्षा आपण सर्व हिंदू आहोत, हा प्रत्येकाने विचार करावा. सर्व स्वामीजींचा आवाज बनून काडसिद्धेश्वर स्वामीजी वक्फ बोर्ड विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या पाठी सर्व हिंदूंनी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी रोहन जुवळी यांनी स्वागत केले. तर रोहित उमनाबादीमठ यांनी प्रास्ताविक करून वक्फला विरोध का होत आहे? याची पार्श्वभूमी सांगितली.
मग हिंदूंसाठी ‘सनातन बोर्ड’ निर्माण करा
वक्फ बोर्ड सुरू करून अल्पसंख्याकाचे लाड पुरविले जात आहेत. जर वक्फ बोर्ड हटविला जाणे सरकारला शक्य नसेल तर हिंदूंसाठी स्वतंत्र ‘सनातन बोर्ड’ निर्माण करा. यामुळे अटकेपार हिंदूंचे राज्य असल्याने या सर्व जमिनींवर आम्हाला आमचा हक्क मागता येईल. तसेच देशात जेथे जेथे हिंदू जमिनी आहेत. त्या सनातन बोर्डला देण्यात येतील आणि हे जर शक्य नसेल तर वक्फ बोर्ड रद्द करावाच लागेल, असा इशारा काडसिद्धेश्वर स्वामीजींनी दिला.