शनिवार खुटावर पार्किंगवरून हाणामारी
बेळगाव : शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच वाहन लावण्यावरून होणारी वादावादी शहरवासियांना आता काय नवीन राहिलेली नाही. सोमवारी शनिवार खूट येथे चारचाकी पार्किंग करण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले. त्यामुळे दुपारपर्यंत दोन्ही बाजूच्या तरुणांची गर्दी होती. शहरात पे अँड पार्किंगची व्यवस्था असतानाही जागा मिळेल तेथे दुकानांसमोर तसेच रस्त्याशेजारी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे दुकानदार आणि वाहनचालकांचे खटके उडत आहेत.
विशेषत: शहराच्या मध्यवर्ती भागात अरुंद गल्ल्यांमध्ये वाहने पार्किंग करून अनेक जण खरेदीसाठी बाजारात जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता एका गोवा नंबरची चारचाकी शनिवार खूट परिसरात आली. चारचाकी वाहनाच्या पलीकडे दुचाकी पार्किंग करण्यात आली होती. दुचाकी काढता येत नसल्याने कारचालकाशी त्याची शाब्दिक चकमक उडाली. त्या दोघांची हमरीतुमरी झाली आणि एकमेकांचे कपडे फाटले. कारमधील महिलेने दुचाकीचालकाच्या कानशिलात लगावल्याने दुचाकीचालकानेही त्या महिलेवर हात उगारत तेथून पोबारा केला. परंतु, यामुळे दुपारपर्यंत संबंधित दुचाकीचालकाचा शोध सुरू होता.