Sangli Crime : सांगलीत खुनी हल्ल्यातील गुंडाला पोलीस कोठडी
धामणी रस्त्यावर दारू पिण्याच्या ठिकाणी हिंसाचार
सांगली : धामणी रस्त्यावरील बीअर शॉपीसमोर तडीपार गुंड मेघशाम उर्फ मोट्या जाधव (३५, रा. शामरावनगर) याने दोघांवर चाकूने हल्ला केला. त्याला काल रात्री अटक करण्यात आली असून दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या हल्ल्यात सचिन प्रकाश पोळ (३६, रा.शामरावनगर) व सिद्धार्थ लक्ष्मण पुकळे (३७, रा. कुपवाड) हे दोघे जखमी झाले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोट्या जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगलीतून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्याचा वावर सांगलीत असायचा. त्याच्यावर यापूर्वीही शहर पोलिसांनी कारवाईकेली होती. जखमी सचिन पोळ आणि सिद्धार्थ पुकळे हे त्याचे मित्र होते. काल दुपारी धामणी रस्त्यावरील दादा बीअर शॉपी येथे दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी पूर्वीच्या वादातून संशयित मोठ्या आणि पोळ यांच्यात वाद झाला.
वाद टोकाला गेल्यानंतर मोट्या याने स्वतः जवळील चाकून पोळ याच्यावर वार केले.
त्यावेळी भांडणसोडवण्यासाठी आलेल्या पुकळे याच्यावरही वार करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोळ याच्या छातीवर, पोटात चार वर्मी वार घातले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर पुकळे याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.