पाचगाव येथे झेंडा लावण्यावरुन दोन गटात मारामारी
दोघे जण किरकोळ जखमी : गावात तणावपूर्ण शांतता:मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
कोल्हापूर :
पाचगाव (ता. करवीर) गावामध्ये पक्षीय झेंडा लावण्यावरुन कारणावरुन तरुणाच्या दोन गटात मारामारी झाली. या मारामारीत एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे. सुरेश बंडोपंत पाटील (वय 34) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर साहिल उगळे हा किरकोळ जखमी झाला आहे. या घडल्या प्रकाराने गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून, गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्याने, दोन्ही गटातील मिळून आठ जणाविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये संग्राम गोपाळ पाटील, शुभम गोपाळ पाटील, नारायण गाडगीळ, सुरेश पाटील, युवराज रामचंद्र उगळे, साहिल केरबा उगळे, विशाल आकाराम पोवार, संजय राजाराम पाटील (सर्व रा. पाचगाव) याचा समावेश आहे.
साहिल उगळे यांने दिलेल्या फिर्यादीमध्ये शुभम गोपाळ पाटील, समीर जांभळे, ओमकार पोवार हे ऋतुराज पाटील यांचा प्रचार करीत, पक्षाचे झेंडे गल्लीत लावत होते. यावेळी त्यांना उगळे या तरुणाने आपल्या घरावर झेंडा लावण्यास विरोध केला. तरीदेखील त्यांनी पक्षीय झेंडा लावून निघून गेले. त्यानंतर तो झेंडा उगळेंने काढून ठेवला. पुन्हा शुभम पाटील, नारायण गाडगीळ, सुरेश पाटील हे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी पुन्हा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांने त्याला विरोध केल्याने त्याला शिवीगाळ करीत, झेंडाच्या काठीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी त्यांने पोलिसात संग्राम गोपाळ पाटील, शुभम गोपाळ पाटील, नारायण गाडगीळ, सुरेश पाटील याच्या विरोधी फिर्याद दिली.
तर साताप्पा श्रीकांत पाटील यांने दिलेल्या फिर्यादीत, साताप्पा पाटील आणि त्यांचा मित्र सुरेश पाटील हे दोघे जण मोपेडवरुन गावातील भैरवनाथ गल्लीतून जात होते. यावेळी त्यांची संशयीत युवराज रामचंद्र उगळे, साहिल केरबा उगळे, विशाल आकाराम पोवार, संजय राजाराम पाटील या चौघांनी त्यांची मोपेड अडविली. तुला मस्ती आली आहे, तु आमच्या घरासमोर झेंडे लावतो. तुला आता बघून घेतो, असे म्हणत संशयीत युवराज उगळेंने हातातील फायटर सारखे हत्याराने सुरेशच्या तोंडावर मारले. तर साहिल उगळे, विशाल पोवार या दोघांने लोखंडी सळईने आणि संजय पाटील यांने काठीने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. जखमीस त्वरीत सीपीआरमध्ये दाखल केले. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
या घडल्या प्रकाराने गावात मोठा तणाव निर्माण झाला. याची माहिती समजताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मोठा पोलीस बंदोबस्त घेवून त्वरीत पाचगावमध्ये दाखल झाले. त्यांनी तणावामध्ये हस्तक्षेप करीत, परिस्थिती नियंत्रणात आणली. मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे गावाला पोलीस छावनीचे स्वरुप आले आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.