बुडा आयुक्तांच्या आदेशाविरोधात लढा
जय किसान भाजी मार्केट पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा लँड युज बदल रद्द केल्याचा आदेश बुडा आयुक्तांनी बजावल्यानंतर या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात रिटपिटिशन दाखल करण्यात आली आहे. लँड युज बदल रद्द करण्याचा अधिकार बुडा आयुक्तांना नाही. घाईघाईने कोणताही आदेश बजावू नये, अशी सूचना उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिली आहे. यासंदर्भात आपण न्यायालयीन लढा देत असून, काही जण विनाकारण भाजी मार्केटची बदनामी करत आहेत. बुडा आयुक्तांनी बजावलेल्या नोटिसीनंतर आम्ही पंधरा दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, त्यांनी लँड युज बदल रद्द केल्याचा आदेश जारी केला असल्याचे जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील, उपाध्यक्ष मोहन मन्नोळकर, सेक्रेटरी करीमसाब बागवान, अॅड. संजय पाटील, मोहम्मद इक्बाल डोणी, उमेश पाटील, सुनील भोसले, विश्नाथ पाटील, सुरेश हावळ, रियाज डोणी आदी उपस्थित होते. जय किसान भाजी मार्केट सुरू होण्यापूर्वी रविवार पेठेतील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये व्यापार केला जात होता. त्या ठिकाणी जागेची कमतरता जाणवू लागल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील किल्ला आवारात भाजी मार्केट सुरू करण्यात आले. पण त्या ठिकाणीही जागेची कमतरता व वाहतूक कोंडीमुळे समस्या जाणवू लागल्याने एपीएमसीमध्ये स्थलांतरित होण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती करण्यात आली. पण त्यांनी स्थलांतरित करून घेतले नाही.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण, पण विनाकारण त्रास
तत्कालिन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांनी दुसरीकडे खासगी जागेत भाजी मार्केट सुरू करण्यासंदर्भात तोंडी आदेश दिल्याने जय किसान भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यंतरी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये काही दिवस व्यवसाय करण्यात आला. पण कोरोना काळात मंदी आल्याने तेथील व्यापारी जय किसान भाजी मार्केटमध्ये स्थलांतरित झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. पण काही जणांकडून विनाकारण त्रास दिला जात आहे, असे यावेळी सांगण्यात आले.