महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-इंग्लंड यांच्यात पाचवी कसोटी आजपासून

07:00 AM Jul 01, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जसप्रित बुमराहकडे प्रथमच नेतृत्वाची धुरा, तूर्तास, भारतीय संघ 2-1 फरकाने आघाडीवर, 2007 नंतर प्रथमच इंग्लिश भूमीत मालिकाविजयाची संधी

Advertisement

बर्मिंगहम / वृत्तसंस्था

Advertisement

भारत-इंग्लंड यांच्यात गतवर्षी आयोजित 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित शेवटची कसोटी आजपासून (शुक्रवार दि. 1) खेळवली जाणार असून बुमराहच्या माध्यमाने 35 वर्षानंतर प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व एखाद्या जलद गोलंदाजाकडे असणार आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 फरकाने आघाडीवर आहे. गतवर्षी कोरोना उद्रेकामुळे उर्वरित कसोटी लांबणीवर टाकणे भाग पडले होते. ती आजपासून आयोजित करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.

नियमित कर्णधार रोहित शर्माला याच आठवडय़ात कोरोनाची बाधा झाल्याने तो सामन्यात खेळणार का, याबद्दल सर्वप्रथम साशंकता निर्माण झाली आणि त्यानंतर  उपकर्णधार केएल राहुल स्पोर्ट्स हर्नियावरील शस्त्रक्रियेमुळे संघाबाहेर फेकला गेला. त्यानंतर कर्णधार म्हणून बुमराहची निवड करण्यात आली.

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वैशिष्टय़पूर्ण जलद गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा जसप्रित बुमराह भारतीय कसोटी संघाचा 36 वा कर्णधार असेल. जागतिक कसोटी क्रिकेटमध्येही सर्वोत्तम जलद गोलंदाजांमध्ये बुमराहचा प्राधान्याने समावेश होतो. मात्र, आज बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघासमोर बुमराह कर्णधार या नात्याने मैदानावर उभा ठाकेल, त्यावेळी त्याच्यासमोर पहिलेच आव्हान तगडे असेल.

इंग्लिश संघ उत्तम बहरात

अलीकडेच न्यूझीलंडचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत इंग्लंडने आपला बहारदार फॉर्म अधोरेखित केला असून तोच धडाका भारताविरुद्ध देखील कायम राखण्याचा मानस या संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केला. इंग्लंडचे बहुतांशी फलंदाज उत्तम बहरात असून जागतिक क्रिकेटमध्ये फारशी ओळख प्राप्त नसलेले काही जलद गोलंदाजही डावात अगदी 5 बळी घेत आश्चर्याचे धक्के देत आले आहेत. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा एरवी फ्लॅट स्वरुपाच्या राहिल्या असून तीच मालिका येथेही कायम ठेवण्यात आली तर जसप्रित बुमराह, शमी, सिराज यांना त्यांचा लाभ घेता येऊ शकेल.

नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झालेला जो रुट सध्या उत्तम बहरात परतला असून आयपीएलमुळे आत्मविश्वास उंचावलेला जॉनी बेअरस्टो अलीकडे 120 पेक्षा अधिक स्ट्राईकरेटने जवळपास 400 धावा फटकावण्यात यशस्वी झाला आहे.

संभाव्य संघ

भारत : जसप्रित बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, उमेश यादव.

इंग्लंड (अंतिम एकादश) : ऍलेक्स लीस, झॅक क्राऊली, ऑलि पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.

सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 3.30 पासून.

इंग्लंडने मागील काही सामन्यात अगदी अडचणीच्या परिस्थितीतून कौशल्याने मार्ग काढत विजय खेचून आणले आहेत. मात्र, येथे आम्ही त्यांच्या ताकदीवर लक्ष पेंद्रित करण्याऐवजी आमच्या बलस्थानावर फोकस ठेवत विजयश्री संपादन करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावू.

-भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड

न्यूझीलंडविरुद्ध 3-0 अशी एकतर्फी मालिका जिंकण्यात आम्हाला यश आले असले तरी भारत हा स्वतंत्र प्रतिस्पर्धी आहे. साम्य इतकेच असेल की, आम्ही ज्या तडफेने न्यूझीलंडविरुद्ध खेळलो, त्याच तडफेने भारताविरुद्धही खेळू.

-इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स

इंग्लिश संघात जेम्स अँडरसनचे पुनरागमन

यजमान इंग्लिश संघाने भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यासाठी 11 सदस्यीय संघ जाहीर केला असून यानुसार, जेम्स अँडरसनचे पुनरागमन झाले आहे. तो जेमी ओव्हर्टनऐवजी संघात परतणार आहे. आश्चर्य म्हणजे याच ओव्हर्टनने गत आठवडय़ात हेडिंग्ले येथील कसोटी पदार्पणात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती.

बेन्डॉन मॅक्युलमचे प्रशिक्षण व बेन स्टोक्सचे नेतृत्व यामुळे सध्याचा इंग्लिश संघ विद्यमान कसोटी चॅम्पियन्स न्यूझीलंडचा 3-0 असा एकतर्फी फडशा पाडण्यात यशस्वी ठरला असून ‘हाय रिस्क, हाय रिवार्ड’ या धोरणावर त्यांचा अधिक भरवसा असल्याचे मागील मालिकेत प्रकर्षाने दिसून आले आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिका

संघ / खेळलेल्या मालिका / विजयाची टक्केवारी

मागील 35 वर्षात एकही जलद गोलंदाज भारताचा कर्णधार का नाही?

भारताचा अव्वल दर्जाचा जलद गोलंदाजी अष्टपैलू कपिलदेवने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले. मात्र, 1987 मध्ये त्याला डच्चू दिला गेल्यानंतर एकाही जलद गोलंदाजाला हा मान लाभला नाही. जावगल श्रीनाथ व झहीर खान हे देखील भारताचे अव्वल जलद गोलंदाज होते. मात्र, त्यांचा अगदी उपकर्णधारपदासाठी देखील कधीच विचार झाला नाही. त्यामुळे, भारताला कपिलदेवनंतर पुढील जलद गोलंदाज कर्णधार म्हणून लाभण्यासाठी 35 वर्षांचा कालावधी लागला. आताही नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे व प्रस्तावित उपकर्णधार केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे बाहेर फेकले गेल्यामुळेच बुमराहची कर्णधार म्हणून वर्णी लावली गेली.

कसोटी इतिहासातील भारताचे आजवरचे कर्णधार

कर्णधार / कालावधी / सामने / विजय / पराभव / अनिर्णीत

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article