For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचव्या टप्पा : ‘कलंकितां’ची संख्या मोठी

06:22 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाचव्या टप्पा   ‘कलंकितां’ची संख्या मोठी
Advertisement

निवडणुकीच्या राजकारणात कलंकित उमेदवार मोठ्या संख्येने असणे ही बाब आता सर्वसामान्य (आणि सर्वमान्यही) झाली आहे. 20 मे या दिवशी, अर्थात, येत्या सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा होणार आहे. या टप्प्यातही अर्थातच, मागच्या चार टप्प्यांप्रमाणे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे कोट्याधीश आणि धनवान उमेदवारही मोठ्या संख्येने दिसून येतात. अशा उमेदवारांचा आढावा, त्यांनीच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरुन ‘असोसिएशन फॉर डेमेव्रेटिक रिफॉर्मस्’ (एडीआर) या सामाजिक संस्थेने घेतला आहे. संस्थेच्या अहवालावरील हा प्रकाशझोत...

Advertisement

पाचवा टप्पा चुरस वाढविणारा 

? लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या मतदान टप्प्यात एकंदर 49 मतदारसंघ असून 695 उमेदवार आपले भवितव्य आजमावित आहेत. यांमध्ये अर्थातच अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तसेच काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आघाडी यांचेही उमेदवार सर्व मतदारसंघात आहेत. हे मतदान 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होत आहे.

Advertisement

? या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, ओडीशा, झारखंड, महाराष्ट्र, लडाख आदी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. पाचव्या टप्प्यासमवेत महाराष्ट्रातील मतदानप्रक्रियाही पूर्ण होत आहे. पाचव्या टप्प्यापासून पुढच्या सर्व टप्प्यांमध्ये पक्षांमधील सत्तेसाठीची चुरस अधिकच वाढत जाणार असल्याने प्रचारात सर्व सामर्थ्य झोकण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत आहेत.

पाचव्या टप्प्यात कलंकित किती...

? पाचव्या टप्प्यातील 695 उमेदवारांमधील 159, अर्थात 23 टक्के उमेदवार ‘कलंकित’ आहेत. कलंकित याचा अर्थ ज्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असा आहे. त्यांच्यापैकी 3 उमेदवारांनी त्यांच्या विरोधात दोष सिद्ध झालेले गुन्हे नोंद असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांना झालेली शिक्षा दोन वर्षांपेक्षा कमी असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर ते निवडणुकीसाठी सिद्ध झाले आहेत.

? चार उमेदवारांनी त्यांच्या विरोधात हत्या केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती दिली आहे. तर अन्य 28 उमेदवारांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात सादर करण्यात आला आहे, असे म्हटले आहे. महिलांविरोधात गुन्हे केल्याची नोंद 29 उमेदवारांच्या विरोधात असून, एका उमेदवारच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हाही सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे

? प्रक्षोभक भाषणे करणे, विविध समाजघटकांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, अवमानजक भाषेचा उपयोग करणे, आदी गुन्हे 10 उमेदवारांविरोधात नोंद करण्यात आल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून मिळते. तसेच फारसे गंभीर नसलेले गुन्हेही या कलंकित उमेदवारांपैकी काही जणांविरोधात नोंद करण्यात आले आहेत. एकापेक्षा अधिक गुन्हे काही जणांवर लावण्यात आल्याची माहिती आहे

पक्षनिहाय परिस्थिती काय...

? मोठ्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांमध्ये टक्केवारीच्या दृष्टीने काँग्रेसचा क्रमांक वरचा लागतो. या पक्षाने या टप्प्यात 18 उमेदवार उभे केले असून त्यांच्यापैकी 8 जणांवर (45 टक्के) अपराध सादर आहेत. भारतीय जनता पक्षाने या टप्प्यात 40 नेत्यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यापैकी 12 जणांवर अपराधिक प्रकरणे सादर करण्यात आली आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात कलंकित उमेदवारांची संख्या अधिक आहे. मात्र, इतर राज्ये फार मागे नाहीत. यावरुन, गुन्हेगारी वृत्तीचा राजकारणात किती खोलवर प्रभाव पडला असून तो कसा वाढत आहे, हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया राजकीय अभ्यासकांची आहे.

? टक्केवारीच्या दृष्टीने कलंकित उमेदवारांमध्ये समाजवादी पक्षाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. या पक्षाने उत्तर प्रदेशात 10 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले असून त्यांच्यापैकी 5 जणांविरोधात गुन्हे नोंद आहेत. त्या खालोखाल शिवसेनेच्या 6 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांच्या विरोधात गुन्हे आहेत. एआयएमआयएम या छोट्या पक्षाच्या चार उमेदवारांपैकी दोघांच्या विरोधात, तृणमूल काँग्रेसच्या सात उमेदवारांपैकी 2 जणांच्या विरोधात, उद्धव ठाकरे गटाच्या 8 उमेदवारांपैकी 3 जणांच्या विरोधात, तर राजदच्या 5 पैकी 1 च्या विरोधात अपराध नोंद आहेत. त्यामुळे पक्ष मोठा किंवा लहान असला तरी फारसे अंतर नाही, हे स्पष्ट होते.

पक्ष आणि कलंकित उमेदवार...

पक्ष               एकंदर उमेदवार      गंभीर  उमेदवार

भारतीय जनता पक्ष              40                  1 2

काँग्रेस                             18                   7

समाजवादी पक्ष                10                      5

ठाकरे गट                      8                         3

तृणमूल काँग्रेस                7                        3

शिवसेना                        6                        3

एमआयएम                    4                      2

राजद                             5                     1

उमेदवारांची संपत्ती किती...

? 695 उमेदवारांपैकी एक तृतियांश, अर्थात 227 उमेदवार कोट्याधीश आहेत. कोट्याधीश उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाचा क्रमांक वरचा आहे. या पक्षाच्या 40 उमेदवारांपैकी 36 धनवान आहेत. तर एमआयएमच्या चार उमेदवारांमधील 2 उमेदवारांनी 1 कोटी पेक्षा अधिक संपत्ती घोषित केली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारांकडे सरासरी 3.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

संपत्तीची वर्गवारी

श्रेणी    उमेदवार संख्या

5 कोटीपेक्षा अधिक       86

2 कोटी ते 5 कोटी        73

50 लाख ते 2 कोटी       162

10 लाख ते 50 लाख       177

10 लाखापेक्षा कमी             199

सर्वात धनवान कोण...

? उत्तर प्रदेशातील झांशी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुराग शर्मा पाचव्या टप्प्यातील सर्वात धनवान नेते आहेत. त्यांनी 212 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. दुसरा क्रमांक महाराष्ट्रातील भिवंडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांचा असून त्यांची संपत्ती 116 कोटी रुपयांची आहे. केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियुष गोयल यांचा तिसरा क्रमांक असून त्यांनी 110 कोटी रुपयांची संपत्ती आपल्या प्रतिज्ञापत्रात घोषित केलेली आहे.

सर्वात निर्धन कोण...

? एका उमेदवाराने त्याच्याकडे काहीही संपत्ती नसल्याचे, अर्थात शून्य संपती असल्याचे घोषित केले असून तो अपक्ष उमेदवार आहे. आणखी तीन उमेदवारांनी त्यांच्याकडे अनुक्रमे 67 रुपये, 700 रुपये आणि 5 हजार 427 रुपये असल्याची घोषणा केली आहे. 5 लाखाहून कमी संपत्ती असणारे 72 आहेत.

उमेदवार आणि शिक्षण...

? एकंदर 695 उमेदवारांमधील 293 उमेदवारांचे (42 टक्के) शिक्षण केवळ 5 वी ते 12 वी या श्रेणीतील आहे. तर 349 उमेदवारांनी (50 टक्के) त्यांचे शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. 26 उमेदवार पदविकाधारक (डिप्लोमा) असून 20 उमेदवारांनी केवळ साक्षर असल्याचे नोंद केली आहे. तर 5 पूर्ण निरक्षण उमेदवारही स्पर्धेत आहेत.

उमेदवारांचा वयोगट...

? 695 उमेदवारांपैकी 30 टक्के, अर्थात 207 उमेदवार 25 ते 40 वयोगटातील आहेत. 384 उमेदवार (55 टक्के) 41 ते 60 वयोगटातील, तर 103 उमेदवार (15 टक्के) 61 ते 80 वयोगटातील आहेत. केवळ 1 उमेदवार 82 वर्षांचा आहे. 695 उमेदवारांमध्ये महिलांची संख्या 82 (12 टक्के) आहे.

Advertisement
Tags :

.