कुलदीपचा पंजा, अश्विनचा चौकार
इंग्लिश संघ पुन्हा फिरकीच्या जाळ्यात : 218 धावांवर ऑलआऊट : रोहित, जैस्वालची अर्धशतके, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी 1 बाद 135 धावा
वृत्तसंस्था /धरमशाला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणत दिवसअखेर 1 बाद 135 धावा केल्या. भारतीय संघ अद्याप 83 धावांनी पिछाडीवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा 52 तर शुभमन गिल 26 धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, कुलदीप यादवने 5 आणि आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने 4 विकेट्स घेत साहेबांना अवघ्या 218 धावांवर गुंडाळले. विशेष म्हणजे, टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी सर्व 10 विकेटस घेतल्या. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. पण कुलदीपने ही भागीदारी तोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेट 27 धावा करून बाद झाला. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप केवळ 11 धावा करू शकला. यानंतर क्रॉलीलाही कुलदीपने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने 108 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 79 धावा केल्या. एके काळी इंग्लंडची धावसंख्या 38 व्या षटकात दोन गडी बाद 137 धावा होती. यानंतर क्रॉलीची विकेट पडली आणि पुढे इंग्लंडचा संपूर्ण डाव गडगडला. 2 बाद 137 अशी अवस्था असताना इंग्लंडचा संघ 58 व्या षटकात 218 धावांवर गारद झाला. जो रूट 26 धावा करून बाद झाला, जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. भारताकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या चायनामन गोलंदाजाने 5 फलंदाजांना बाद केले. अश्विनने 100 व्या कसोटीत 4 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने एक बळी मिळवला.
रोहित-जैस्वालची अर्धशतके
प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने 58 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी केली. फटकेबाजीच्या प्रयत्नात शोएब बशीरच्या चेंडूवर बेन फॉक्सने यशस्वी जैस्वालला यष्टिचित केले. यानंतर रोहितने शुभमन गिलला सोबतीला घेत आणखी पडझड होऊ दिली नाही. रोहितने शानदार अर्धशतक झळकावताना 83 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 52 धावा केल्या. गिलने 39 चेंडूत 26 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 30 षटकांत 1 बाद 135 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव सर्वबाद 218 (क्रॉली 79, बेअरस्टो 29, फोक्स 24, रुट 26, कुलदीप 72 धावांत 5 तर अश्विन 51 धावांत 4 बळी) भारत 30 षटकांत 1 बाद 135 (जैस्वाल 57, रोहित खेळत आहे 52, गिल खेळत आहे 26, बशीर 64 धावांत 1 बळी).
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हिटमॅनचा आणखी एक विक्रम
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत व इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या डावातील पहिला षटकार मारताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. रोहित शर्मा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 50 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. तर अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या बेन स्टोक्सने डब्ल्यूटीसीमध्ये 50 षटकार पूर्ण केले आहेत.
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
- बेन स्टोक्स - 78 षटकार
- रोहित शर्मा - 50 षटकार
- रिषभ पंत - 38 षटकार
यशस्वी जैस्वालने अवघ्या सात महिन्यात विराटला टाकले मागे
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला. त्याने भारताकडून इंग्लंडविरु एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. मालिकेतील चौथ्या कसोटीत जैस्वालने विराट कोहलीच्या 655 धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने आपला पहिला डाव सुरू केला. यशस्वीने एक धाव घेताच तो इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जैस्वालने मालिकेतील पाच कसोटी सामन्यात तब्बल 712 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- यशस्वी जैस्वाल - 712 धावा, 2024
- विराट कोहली - 655 धावा, 2016
- राहुल द्रविड - 602 धावा, 2002
टीम इंडियाकडून अश्विनला गार्ड ऑफ ऑनर
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने धरमशाला कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला. तो भारताकडून 100 वी कसोटी खेळणारा 14 वा खेळाडू ठरला. सामन्यापूर्वी बीसीसीआयकडून अश्विनचा विशेष सन्मान करण्यात आला. राहुल द्रविडने अश्विनला कॅप देत त्याचा गौरव केला. या खास क्षणी अश्विनची पत्नी प्रीती आणि त्याच्या दोन मुलीही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. यावेळी भारतीय संघाने अश्विनला गार्ड ऑफ ऑनरही दिला. दरम्यान, 100 कसोटी खेळणारा अश्विन हा भारताचा 14 वा खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, इशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि विरेंद्र सेहवाग यांनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.
देवदत्त पडिक्कलचे कसोटी पदार्पण
धरमशाला येथील कसोटीत देवदत्त पडिक्कलने टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केले. प•ाrकलला रविचंद्रन अश्विनने पदार्पणाची कॅप दिली. यापूर्वी रांची येथील चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाज आकाश दीपने भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. आता देवदत्त पडिक्कललाही पदार्पणाची संधी मिळाली आहे. पडिक्कलने याआधीच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले आहे.
कुलदीप यादवची अनोखी ‘हाफ सेंच्युरी’
टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या नावावर या कसोटीत अनोख्या हाफसेंच्युरीची नोंद झाली. कुलदीपने बेन स्टोक्स, बेन डकेट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्राऊलीची विकेट घेतली. याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 50 विकेटचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे, कुलदीपने सर्वात कमी चेंडू टाकून कसोटीत 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. कुलदीपने कसोटी करिअरमध्ये आतापर्यंत 1871 चेंडू टाकून 50 बळी पूर्ण केले आहेत.