गोव्यात आजपासून फिडे विश्वचषक स्पर्धा
डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसीला सर्वोत्तम संधी
वृत्तसंस्था/ पणजी
गोव्यात आज शनिवारी सुरू होणाऱ्या फिडे विश्वचषकात जगातील अव्वल तीन क्रमांकांच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरताना ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याची आशा असेल. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो काऊआना ही अमेरिकन जोडी स्पर्धा करत नसल्याने विश्वविजेता डी. गुकेश आणि अर्जुन एरिगेसी ही इतर दोन मोठी नावे आहेत, जी या प्रतिष्ठित स्पर्धेत ठसा उमटविण्याचा प्रयत्न करतील.
या स्पर्धेत दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा बक्षीस निधी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या 2026 च्या फिडे कँडिडेट स्पर्धेसाठी प्रवेशद्वार म्हणून या स्पर्धेला महत्त्व असून तीन प्रतिष्ठित पात्रता स्थाने या स्पर्धेतून उपलब्ध होणार आहेत. 80 देशांमधील 206 अव्वल बुद्धिबळपटू पुढील चार आठवडे गोव्यात आठ फेऱ्यांच्या, सिंगल-एलिमिनेशन बाद स्पर्धेत खेळताना दिसतील. प्रत्येक सामन्यात मानक वेळेच्या नियंत्रणाखाली खेळल्या जाणाऱ्या दोन क्लासिकल गेम्स असतील. जर क्लासिकल गेम्सनंतर देखील गुण बरोबरीत राहिले, तर खेळाडू तिसऱ्या दिवशी जलद आणि ब्लिट्झ टायब्रेकच्या मालिकेसाठी परततील आणि कोण पुढे जाईल हे ठरवतील.
तीन अव्वल भारतीयांमध्ये तसे पाहिल्यास गुकेशसाठी ही स्पर्धा सर्वांत कमी महत्त्वाची आहे. कारण तो विश्वविजेता आहे आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी त्याला कँडिडेटच्या चक्रातून जाण्याची आवश्यकता नाही. प्रज्ञानंदला पुढील कँडिडेट स्पर्धेत स्थान मिळणे जवळजवळ निश्चित झाले असले, तरी एरिगेसी पुढील वर्षाच्या सुऊवातीला होणाऱ्या त्या सर्वांत मोठ्या स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. कँडिडेटमधून पुढील जागतिक अजिंक्यपद सामन्यात गुकेशला कोण आव्हान देईल हे ठरेल. कँडिडेट स्पर्धेसाठी तीन जागा पणाला लागलेल्या असल्याने, अनुभवी विदित गुजराथी आणि पेंटाला हरिकृष्ण यांनाही स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, तऊण निहाल सरिन आणि अरविंद चिदंबरम हे देखील या स्पर्धेत प्रबळ दावेदार असतील. 
भारताचे 24 खेळाडू या स्पर्धेत उतरलेले असून पहिल्यांदाच भारताचा इतका मोठा सहभाग यात दिसून आलेला आहे. अव्वल 50 खेळाडूंना थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे, तर उर्वरित 156 खेळाडू पहिल्या फेरीत लढतील. 156 पैकी 78 खेळाडू दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर दुसऱ्या फेरीत अव्वल 50 खेळाडू त्यांना येऊन मिळतील.
भारतीय खेळाडूंनी मागील काही काळात चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागांत ऑलिंपियाड जिंकणे, गुकेशने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे आणि दिव्या देशमुखने महिला विश्वचषक जिंकणे यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची ही एक उत्तम संधी असेल.
तथापि, भारताबाहेरूनही एक मोठा प्रतिभासमूह आला आहे. यातील एक प्रमुख खेळाडू म्हणजे डचमन अनिश गिरी आहे, ज्याने मागील ग्रँड स्विस स्पर्धेत विजय मिळवून पॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले आहे. जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरने विश्वचषकापूर्वी आपला फॉर्म मिळवला आहे, तर उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह हा, विशेषत: खेळाच्या वेगवान आवृत्तीतील त्याच्या कामगिरीमुळे लक्ष ठेवण्यासारखा आणखी एक खेळाडू आहे.