हडफडेत रंगणार फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात फिडे बुद्धिबळ विश्व चषक 2025 स्पर्धेचे आयोजन 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत होईल. तब्बल 23 वर्षांनंतर ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे.
स्पर्धा हडफडे बार्देश येथील रिसोर्ट रिओ येथे होणार असून यात 82 देशांतील 206 खेळाडू यात सहभागी होतील. सदर स्पर्धा ‘नॉक-आउट’ पद्धतीने खेळवली जाणार असून यातील विजेत्याला तब्बल 2 मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. या विश्व चषक स्पर्धेचा विजेता केवळ विजेतेपद नाही तर 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये आपले स्थान मिळवेल, त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिपकडे जाण्याची अंतिम पायरी आहे.
या स्पर्धेत जगातील नामवंत खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. डी. गुकेश, अर्जुन एरिगैसी, आर. प्रग्नानंदा, अनिश गिरी, वेस्ली सो, विन्सेंत केमर, हान्स नीमन, नादीरबेक अब्दुसत्तोरोव, इयान नेपोम्नियाची, रिचर्ड रॅपोर्ट, विदित गुजराथी, निहाल सरीन आणि इतर अनेक दिग्गज खेळाडू यात सहभागी होणार आहेत.
यंदाच्या स्पर्धेत विशेष आकर्षण ठरणार आहे तो फॉस्टिनो ओरो. अर्जेंटिनाचा हा खेळाडू फक्त 12 वर्षांचा आहे. ओरो हा फिडे विश्व कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत लहान वयाचा सहभागी ठरणार आहे. भारताची उदयोन्मुख खेळाडू दिव्या देशमुख हिला ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’द्वारे संधी मिळाली असून ते खुल्या गटात खेळेल.V2002 नंतर प्रथमच भारतात परतणारा हा विश्व कप देशातील वाढत्या बुद्धिबळप्रेम आणि नव्या पिढीतील ग्रँडमास्टरांच्या जागतिक यशाची साक्ष देतो. गोव्याची समृद्ध संस्कृती, सजीव वातावरण आणि निसर्गरम्यता या भव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेला अविस्मरणीय पार्श्वभूमी देणार आहेत.
लोगोचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते अनावरण
फिडे विश्व कप गोवा 2025 साठी तयार केलेला लोगो हा गोव्याच्या किनारपट्टीतील मोहक सौंदर्य आणि बुद्धिबळाच्या रणनीतिक सौंदर्याचा सुंदर संगम आहे. हिरव्या रंगाच्या भागात पांढरे नारळाचे झाड दाखवले आहे. खाली निळी लाट आहे. लाल रंगाच्या पॅनलमध्ये पांढऱ्या चौकटींनी बनवलेला हिऱ्याच्या आकाराचा नमुना आहे जो बुद्धिबळाच्या पटाचे प्रतिकात्मक दर्शन घडवतो. पिवळ्या पॅनलमध्ये वाकलेल्या किरणांसह एक स्टाईलायझ्ड सूर्य दाखवला आहे. या लोगोमध्ये गोव्याची संस्कृती, उब आणि रंगतदार ओळख जिवंतपणे दिसून येते.
दलेर मेहंदीने गायिले स्पर्धेचे अधिकृत गीत
या स्पर्धेचे अधिकृत गीत प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी गायले आहे. पहिल्यांदाच भारत फक्त आयोजक नाही, तर नायक म्हणूनही उभा आहे. प्रत्येक भारतीय खेळाडू, तानिया, गुकेश, हम्पी आणि विदित हे भारतीय बुद्धिबळाच्या प्रवासातील प्रतिभा. परंपरा, बुद्धिमता आणि प्रेरणा ह्या स्तंभांचे प्रतिनिधीत्व करतात.
देश, गोव्यासाठी अभिमान: डॉ. प्रमोद सावंत
फेड विश्व कप बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करणे ही भारत आणि गोव्यासाठी अभिमानास्पद आणि मोठी कामगिरी आहे, जी जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास दर्शवते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लोगोचे अनावरण केल्यानंतर म्हणाले.
हे आपल्या तरूणांना मोठे स्वप्न पाहण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची प्रेरणा देते. गोव्यातील सर्व युवा खेळाडूंसाठी आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे, प्रशिक्षण वाढवणे आणि समान संधी सुनिश्चित करणे यासाठी सरकारला वचनबद्ध केले आहे. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गोवा हे त्याच्या समुद्रकिनारे आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते, परंतू ते शिक्षणासाठी एक मजबूत केंद्र देखील बनत आहे. आमच्या शाळा आणि महाविद्यालये आता शिक्षणाचा एक भाग म्हणून बुद्धिबळाचा समावेश करत आहेत. बुद्धिबळ हा खेळ तरूणांचे मन तीक्ष्ण करण्यास, आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि धोरणात्मक विचार शिकवण्यास मदत करते. अलिकडच्या वर्षांत, गोव्याच्या बुद्धिबळ संस्कृतीत खूप वाढ झाली आहे. तरूण ध्येयवेडे खेळाडू आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करत आहेत. गोव्याच्या खेळाडूंची प्रगती पाहून आम्हाला खरोखर अभिमान वाटत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.