फिडे महिला विश्वचषक : हम्पी, दिव्याकडून बरोबरीची नोंद
वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया
फिडे महिला विश्वचषक उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेईशी काळ्या रंगाच्या सोंगट्यांसह खेळताना आरामात बरोबरी साधली, तर दिव्या देशमुखच्या भक्कम बचावापुढे माजी महिला विश्वविजेती झोंगयी टॅनची निराशा होऊन तिला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
दोन भारतीय आणि दोन चिनी खेळाडू अंतिम चारमध्ये असल्याने महिला बुद्धिबळातील आशियाई वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. परंतु आता अंतिम दोन स्थानांसाठी ही लढाई चालली आहे. वरवर पाहता या दोन्ही भारतीय खेळाडूंनी काळ्या रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळताना बरोबरीत सामने सोडवून सुऊवात चांगली केली आहे आणि परतीच्या सामन्यात दोघीही पांढऱ्या रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळतील.

जर या 6 लाख 91 हजार 250 अमेरिकन डॉलर्स इनामांच्या स्पर्धेत पुढील निकालही बरोबरीत राहिले, तर विजेता निश्चित करण्यासाठी कमी कालावधीचे सामने खेळले जातील. तसेच पुढील महिला कँडिडेट्स स्पर्धेतील तीन स्थाने या स्पर्धेतून ठरणार आहेत, ज्यामुळे किमान एक भारतीय पात्र होईल याची खात्री झाली आहे. महिला बुद्धिबळपटू म्हणून उल्लेखनीय ठसा उमटविलेल्या झोंगयी टॅनविऊद्ध दिव्याची लढत आधी झाली. या माजी विश्वविजेत्या चिनी खेळाडूला दिव्याच्या सुऊवातीच्या खेळात कोणतीही कमतरता काढता आली नाही. दिव्याने जवळजवळ मनाप्रमाणे खेळ केला. पण शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की, बरोबरीशिवाय दुसरा कुठलाही निकाल शक्य नसल्याचे दिसून आले.
भारताची अव्वल महिला खेळाडू हम्पीने लेईला सलामीलाच मोठा धक्का दिला, जो उच्च स्तरावरील बुद्धिबळात नियमितपणे पाहायला मिळत नाही. हम्पीचा मुकाबला करताना चिनी खेळाडूची सर्वोत्तम संसाधने देखील अपुरी पडली. हम्पीने आपण कधीही धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली आणि शेवटी हा सामना बरोबरीत सुटला.