फिडे महिला विश्वचषक : दिव्या, हंपी उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ बुटमी, जॉर्जिया
फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि आणि देशातील पहिली महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी वेगवेगळ्या प्रकारे शेवटच्या 16 खेळाडूंच्या टप्प्यात प्रवेश करण्यात यश मिळविले आहे. दिव्याने सर्बियाच्या तिओदोरा इंजॅकविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून आपले स्थान निश्चित केले, तर हंपीने पोलंडच्या कुलोन क्लाउडिया हिला हरवून पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
डी. हरिका, वंतिका अग्रवाल आणि आर. वैशाली या तीन भारतीय खेळाडूंना त्यांच्या टायब्रेकरमधील कामगिरीच्या आधारावर अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याची संधी अजूनही आहे. ग्रीसच्या त्सोलाकिडोउ स्टॅव्ह्रोलासोबतचे सलग दोन सामने बरोबरीत सुटल्यानंतर हरिका अजूनही शर्यतीत आहे. वंतिका अग्रवालचा उत्सव कमी झाला, कारण तिने रशियाच्या कॅटेरिना लॅग्नोविऊद्ध तिचा परतीचा सामना गमावला आणि पहिल्या फेरीतील विजयामुळे बरोबरी साधली. वंतिका, हरिका आणि वैशाली या तिन्ही खेळाडूंना आता 16 व्या फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी आव्हानात्मक टायब्रेक गेमचा सामना करावा लागेल