खत कारखाना बंद, पंप ड्राय, माल नाही
कोल्हापूर / धीरज बरगे :
शेतकरी सहकारी संघाचा खत कारखान बंद आहे. मुंबईचा पेट्रोल पंप वगळता कोल्हापूरातील पेट्रोल पंप ड्राय पडत आहेत. शाखांमध्ये विक्रीसाठी पुरेसा माल उपलब्ध नाही अशी अवस्था सध्या संघाची आहे. संघाकडे भांडवलच नसल्याने उत्पन्नाचे मुख्य स्त्रोतच अडचणीत आले आहेत. याचा परिणाम संघाच्या आर्थिक उलाढालीवर होत असून दिवसेंदिवस संघाची आर्थिकस्थिती बिकट बनत चालली आहे. संघाची सद्यस्थिती पाहता नेते मंडळी लक्ष देणार का, अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.
शेतकरी संघावर असलेल्या प्रशासकीय मंडळ काळात संघाचा कारभार काटकसरीने सुरु होता. संघाचा तोटा याकाळात काही प्रमाणात कमी झाला. पण जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत संघाची निवडणुक घेतली. संघाची आर्थिक घड बसविण्यासाठी नुतन संचालक मंडळ प्रामाणिक प्रयत्न करेल, असे सांगण्यात आले. पण वर्षभराच्या आतच संचालक मंडळातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. काही संचालक संघाच्या माध्यमातून स्वहित साधण्यालाच प्राधान्य देत आहेत. तर नवख्यांना संघाचे कामकाजच समजलेले नाही. त्यामुळे संघाची आर्थिकस्थित बिकट बनत चालली असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे.
खत कारखान्याची दुरुस्ती तरीही बंद
शेतकरी संघाच्या खतांना शेतकऱ्यांमधून मोठी मागणी आहे. त्यामुळे खत कारखाना संघाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र रुकडी येथील कारखान्यातील मशिनरी जुनी झाली आहे. ती बदलणे सध्या शक्य नसल्याने तात्पुरती दुरुस्ती करुन कारखाना सुरु ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कारखान्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यानंतरही कारखाना बंद आहे. पुढील तीन महिने खतांची मोठयाप्रमाणात विक्री होते. पण याकाळातच कारखाना बंद राहिला तर संघाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
पेट्रोल पंप ड्राय, संघाला नोटीस
शेतकरी संघाचे एकूण सात पेट्रोल पंप आहेत. यापैकी मुंबई येथील पेट्रोल पंच सुरुळीत सुरु असुन येथून संघाला सुमारे 50 लाखांचे उत्पन्न मिळते. पण कोल्हापूरातील पेट्रोल पंप वारंवार ड्राय पडू लागले आहे. पंप बंद राहत असल्याने संबंधित पेट्रालियम कंपन्यांनी संघाला पेट्रोल पंड काढुन घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. पेट्रोल पंपसाठी असणारे मॅनेजर पद सहा महिने रिक्त आहे. त्यामुळे येथील कामकाजही रामभरोसे सुरु आहे.
शाखांमध्ये विक्रीसाठी पुरेसा माल नाही
शेतकरी संघाच्या विविध शाखांमध्ये विक्रीसाठी पुरेसा माल उपलब्ध नाही. याचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. अनेक शाखांमध्ये कर्मचारी बसून आहेत. संघाकडे भांडवलच नसल्याने गाडा थांबल्याची चर्चा आहे.
नेत्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे
शेतकरी संघामध्ये कर्मचारी संख्या अपूरी आहे. दैनंदिन कामकाज सुरुळीत सुरु राहण्यासाठी अजून 50 कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. काही शाखांमध्ये कर्मचारीच नसल्याने त्या बंद आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. अनुभवी कामगारांचे म्हणणे जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र त्यांचे म्हणणे जाणून घेतले जात नाही. कर्मचाऱ्यांवर संचालकांचा वचक नाही, अशीच परिस्थिती राहिल्यास संघाची वाटचाल आणखी बिकट बनणार आहे. त्यामुळे संघाची जबाबदारी घेतलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी संघामध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकरी संघ पूर्ण क्षमतेने सुरु होईल
खत कारखाना दुरुस्ती, देखभालीसाठी बंद होता. जानेवारी महिन्यापासून खत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु होवून यामधून संघाला चांगले उत्पन्न मिळेल. संचालक मंडळाकडून काटकसरीने कारभार सुरु असून खर्चावर नियंत्रण आणले आहे. संघावर असणारे कर्जही काही प्रमाणात कमी केले आहे. खेळत्या भांडवालची रक्कमही लवकरच उभा होईल. पुढील दोन महिन्यात शेतकरी संघ पूर्ण क्षमतेने चालविला जाईल.
राजसिंह शेळके, उपाध्यक्ष शेतकरी संघ.