पोसवलेली भातपिके झाली आडवी
परतीच्या पावसामुळे भात पिकाला फटका : बळीराजा संकटात : परतीच्या पावसामुळे सुगी हंगाम साधायचा कसा, याची शेतकऱ्यांना चिंता
वार्ताहर/किणये
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्मयातील पोसवून आलेली भातपिके आडवी झाली आहेत. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. ऐन भात पोसवणीच्या हंगामातच मुसळधार पाऊस होत असल्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा तालुक्मयात मान्सून काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे पेरणी करण्यात आलेल्या भात पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली.
मोठा पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. यामुळे शेत शिवारात पाणी साचले होते. काही शेतकऱ्यांनी भातरोप लागवड केली होती. या भात रोप लागवडीमध्ये पाणी साचल्यामुळे भातरोपे कुजून गेली. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पुन्हा भात रोप लागवड केली. शिवारात भातपीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बरीच मेहनत घेतली आहे. काही शेतातील भातपिके बहरून आली. ती बऱ्यापैकी पोसवत असताना गेल्या आठवडाभरापासून परतीचा पाऊस सुरुच आहे. यामुळे बऱ्याच शिवारातील भातपिके जमीनदोस्त झाली आहेत.
यामुळे वर्षभर पेरणीपूर्व मशागत, पेरणी, लागवड, औषध फवारणी, रासायनिक खतांचा डोस, भांगलण आदींसाठी केलेला खर्च शेतकऱ्यांचा वाया गेला असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. कारण परतीच्या पावसामुळे बहरून आलेली पिकेच आडवी झाल्यामुळे आता उत्पादन मिळणार कसे? उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. तालुक्मयात भात हे मुख्य पीक घेण्यात येते. शेत शिवारात भाताचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊन त्याची विक्री करून बरेच शेतकरी आपल्या वर्षभराचे अर्थकारणाचे नियोजन करतात. मात्र ऐन-भात पोसवणीच्या हंगामातच परतीचा पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता सुगी हंगाम कसा साधायचा? याची चिंता लागून राहिली आहे.