फेरीबोट तिकीट दरवाढ आज मागे घेण्याची शक्यता
सायंकाळपर्यंत अधिसूचना निघणार : खुद्द सत्ताधारी भाजपमधून दरवाढीला विरोध
पणजी : फेरी बोटीच्या दरवाढीसंदर्भात राजकीय क्षेत्रातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन गोवा सरकार अखेर ही दरवाढ आज मंगळवारी मागे घेण्याची शक्यता आहे. सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार गोवा सरकारचा आदेश नदी परिवहन खात्याला मिळाला आहे. नदी परिवहन खात्याचे संचालक आज सदर प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणार असून सायंकाळी दरवाढीचा प्रस्ताव मागे घेतला जाईल. अनेक वर्षानंतर फेरीबोटीचे दर अल्पत: वाढविण्याचा निर्णय नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी जाहीर केला. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. त्यात दुचाकीना किमान भाडे 5 रुपये लागू करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या दुचाकी वाहनांना भाडे लागू नाही. मात्र नव्या प्रस्तावात ते किमान पाच रुपये होते. अन्य वाहनांच्या भाडे दरातही दुप्पटीने वाढ केली होती. नदी परिवहन खात्याचा एकंदरित खर्च पहाता हा दर प्रचंड आहे. प्रस्तावित जी वाढ केली होती ती देखील तुलनेत फार कमी होती. शेजारील राज्याच्या तुलनेत तर ही वाढ अत्यंत नगण्य अशी होती. मात्र त्याला देखील खुद्द सत्ताधारी भाजपमधून विरोध होऊ लागला. अलिकडेच सर्व काही मोफतच मिळायला हवे अशा पद्धतीचा सूर राजकीय क्षेत्रात देखील वाढू लागला आहे. अखेरीस जनतेच्या आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मागणीनुसार सरकारने दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील आदेश आज मंगळवारी जारी होण्याची शक्यता आहे.