Satara : साताऱ्यात घरचोरीची गुन्हा प्रकरणात महिला आरोपी ताब्यात, 6.50 लाखांचे सोनं जप्त
सातारा शहर पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई
सातारा : सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून घरातून चोरी गेलेले तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांचे सोने हस्तगत करत एक महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे.
संगमनगर येथील सत्यमनगर भागातील रहिवासी कल्पना सोनावणे यांच्या घरातून दि. २१ ऑक्टोबर रोजी कपाटातील सोने चोरीला गेले होते. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. घरामध्ये लोक असतानाच चोरी झाल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला होता.
घरात स्वयंपाकासाठी येणाऱ्या अनुजा रोहित कोळी (वय ३५, मूळ रा. इटकरे ता. वाळवा, जि. सांगली) या महिलेवर पोलिसांनी संशय ठेवला होता. ती दिवाळीच्या सुट्टीत सांगलीला गेल्याने तिच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत तपासात सहकार्य करत नव्हती. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर तिने अखेर चोरी केल्याची कबुली दिली.
तिच्याकडून सोन्याचे गंठण, हार, मनिमंगळसूत्र असे एकूण ६.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या महिलेने यापूर्वीही घरकामाच्या ठिकाणी किरकोळ चोऱ्या केल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई सहा. पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, तसेच पोलीस कर्मचारी निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, सुशांत कदम यांनी केली. वरीष्ठांनी या तात्काळ आणि प्रभावी तपासाबद्दल डी.बी. पथकाचे अभिनंदन केले आहे.