फेरीबोटींमध्ये आता दुचाकींनाही शुल्क
नदीपरिवहन खात्याचे मंत्री फळदेसाई यांचा निर्णय
पणजी : राज्यातील फेरीबोट सेवा ही गेल्या अनेक वर्षांपासून मोफत सेवा देत आहे. परंतु या सेवेमध्ये आता नदी परिवहन खात्याने बदल केला असून, आता दुचाकी चालकांना फेरीबोटीमार्गे प्रवास करावा लागल्यास त्यांना शुल्क आकारणीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घेतला आहे. मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, राज्यातील फेरीबोट सेवा ही गोमंतकीयांना सुलभ प्रवास व्हावा, तसेच नदीकाठच्या लोकांना अन्य दुसरा मार्ग नसल्याने ही मोफत सेवा अनेक वर्षांपासून देण्यात येत होती. याचा लाभ गोमंतकीयांना लाभ व्हावा, यासाठी आतापर्यंतच्या सरकारने ही सेवा मोफत ठेवली होती. परंतु आता या फेरीबोटीचा अधिक वापर बिगर गोमंतकीय व कामगार लोक करीत आहेत. या मोफत सेवेमुळे फेरीबोटीवरही आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे दुचाकीचालक जर फेरीबोटीतून प्रवेश करत असतील तर त्यांना येत्या पंधरा दिवसांत प्रत्येकी 5 ऊपये शुल्क भरावे लागणार असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. फेरी सेवा अपग्रेड करण्यासाठी महसूल मिळावा, या उद्देशातून हे शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे फेरीसेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पारंपारिक फेरीच्या 3 पट भार उचलण्याची क्षमता असलेल्या जलद रो रो फेरीसेवा पुढील सहा महिन्यांत राज्यात कार्यान्वित होईल, असेही ते म्हणाले.
फेरीबोटीसाठी मासिक पास योजना
फेरीबोट सेवेसाठी तिकिटाचे शुल्क संपूर्ण गोव्यात एकसमान राहणार आहे. दुचाकींसाठी 5 ऊपये आणि चार चाकी वाहनासाठी 40 ऊपये, असे शुल्क राहील. मासिक पास योजनेअंतर्गत एका महिन्याला दुचाकींसाठी 150 ऊपये आणि चार चाकी वाहनांसाठी 600 ऊपये खर्चाच्या मासिक पासचा पर्याय उपलब्ध आहे. पास आणि तिकिटे पेमेंट गेटवे असलेल्या अॅपद्वारे उपलब्ध असतील, अशी माहितीही मंत्री फळदेसाई यांनी दिली.