स्पर्श केल्यावर मानवी त्वचेसारखा अनुभव
उन्हाळ्यात डॉक्टर नेहमीच लोकांना सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देतात. सूर्याच्या धोकादायक किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन चांगला उपाय आहे. लोकांना हीच बाब समजविण्यासाठी वैज्ञानिकांनी अनोखे फोन कव्हर तयार केले आहे. ज्याला स्पर्श केल्यावर मानवी त्वचेचा आभास होतो. याचबरोबर उन्हात दीर्घकाळ राहिल्याने या कव्हरला सनबर्न देखील होऊ शकते.
सनबर्नच्या धोक्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक अत्यंत अनोखा आणि काहीसा भीतीदायक फोन कव्हर स्कीनकेस तयार करण्यात आला आहे. हा मानवी त्वचेसारखा दिसतो. तसेच उन्हात ते काळे देखील पडते. फ्रान्सचे संशोधक मार्क टेसियर यांनी वर्जिन मीडिया ओ2 सोबत मिळून या अनोख्या कव्हरला डिझाइन केले आहे. हे कव्हर युव्ही किरणांवर प्रतिक्रिया देखील देते. ऊन तीव्र असल्यास हे कव्हर खूप गरम होते, एकप्रकारे हे तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची आठवण करून देते.
अत्यंत खास कव्हर
स्कीनकेस तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य जागरुकता आणि सकारात्मक वर्तन बदलासाठी केला जाऊ शकतो याचे उदाहरण आहे. लोक वारंवार फोन चेक करतात, परंतु तितक्यावेळा सनस्क्रीन लावत नाहीत, असे एका अध्ययनात दिसून आले आहे. याचमुळे स्कीनकेस डिझाइन करण्यात आले असून यातून तुम्हाला स्वत:च्या त्वचेचे रक्षणही करायचे आहे, याची आठवण करुन दिली जाणार आहे. स्कीनकेसला सिलिकॉन आणि युव्ही-रिअॅक्टिव्ह घटकांनी तयार करण्यात आले आहे. याच्या निर्मितीत 3डी प्रीटिंग, हँड स्कल्प्टिंग आणि सुरकुत्या हातांनी कोरण्यात आले आहे. हे तीन वेगवेगळ्या त्वचा रंगांमध्ये उपलब्ध असून युव्ही किरणे पडताच याचा रंग खऱ्या त्वचेप्रमाणे होतो असे टिसेयर यांनी सांगितले.