सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उत्साहात
कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांवकडून मुख्य प्रार्थना : गोव्यासह देशविदेशांतून लाखो भाविकांची हजेरी
प्रतिनिधी/ तिसवाडी
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे वार्षिक फेस्त काल बुधवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. बासिलिका ऑफ बाँ जिझस चर्चमध्ये सकाळी झालेल्या मुख्य प्रार्थना सभेत गोवा, दमण आणि दीवचे महाधर्मप्रांतप्रमुख फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना केली. त्यांना फादर सिमाव फर्नांडिस यांची साथ लाभली.
मुख्य प्रार्थनेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री, आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच हजारो भाविक उपस्थित होते. सरकार आणि विरोधी पक्षातील मान्यवरांनी एकत्र येऊन संतांच्या चरणी नतमस्तक होत गोव्याच्या धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवले.
दिव्यांगांशी सौहार्दाचा संदेश
‘सर्वसमावेशकता : दिव्यांग असलेल्या व्यक्तींशी सौहार्द’ हा यंदाच्या फेस्ताचा विशेष संदेश होता. दि. 23 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या गेल्या नऊ दिवसांच्या नोव्हेनात दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
नीटनेटके आयोजन
फेस्तात भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने विशेष वाहतूक व्यवस्था केली होती. गोवा पोलिसांनी परराज्यांतील वाहनांसाठी विशेष पार्किंग, शटल बस सेवा आणि रस्त्यांचे योग्य नियोजन केले होते. पहाटेपासूनच जुने गोवेत भाविकांचा जनसागर लोटला होता.
पहाटेपासून भाविकांची गर्दी
दरवषीप्रमाणे यंदाही पहाटे ठीक 3.15 वाजता संतांच्या पवित्र देहाचे दर्शन भाविकांना खुले करण्यात आले आणि सकाळी 6.15 वाजेपर्यंत सलग दर्शन सुरू होते. त्यानंतर कार्डिनल फेराव यांच्या प्रमुख प्रार्थनेने सांगता झाली.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषाचे दर्शन घेण्यासाठी केवळ गोव्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते. परदेशातील भाविकांची संख्याही लक्षणीय होती.
मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेस्तानिमित्त संतांचे आशीर्वाद घेताना राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. संपूर्ण फेस्त शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. सेंट फ्रान्सिस झेवियरांच्या कृपेने गोवा सुजलाम् सुफलाम् राहो, अशी प्रार्थना भाविकांनी केली.