For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दंडाची धास्ती, 48 हजार जणांनी घेतला वाहन परवाना !

11:49 AM Jan 08, 2025 IST | Radhika Patil
दंडाची धास्ती  48 हजार जणांनी घेतला वाहन परवाना
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत : 

Advertisement

विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह प्रादेशिक परिवहन विभाग थेट दंडात्मक कारवाई करत आहे. यामुळे वाहन परवाना घेण्यासाठी वाहनधारकांची धडपड दिसून येत आहे. यामुळेच 2024 या वर्षभरात 48 हजार जणांनी वाहन परवाना घेतल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे. यामध्ये सुमारे 31 हजार दुचाकी, 16 हजार चारचाकी चालकांनी परवाने घेतले आहेत.

दुचाकी, चारचाकी असो की अवजड वाहन हे चालविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना आवश्यक असतो. वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे. त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे. हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते. वाहन अधिनियम 1988 अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स (परवाना) आवश्यक असतो.

Advertisement

काहींकडून नियम धाब्यावर बसवून विनापरवाना वाहन चालविले जाते. आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेकडून अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळेच परवाना घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच प्रादेशिक परिवहन विभागात कच्चा परवाना, पक्का वाहन परवाना घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. परवाना घेणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ विभाग रोज 250 दुचाकी वाहनधारकांना कच्चा परवाना घेण्यासाठीच्या परिक्षेसाठी बोलवते. तर रोज 250 पक्का परवाना घेणाऱ्यांची टेस्ट घेतली जाते.

वाहनाचा प्रकार                                    परवाना घेणाऱ्यांची संख्या

गिअर नसणारी मोटरसायकल                            6147

गिअरची मोटरसायकल                                   25307

चारचाकी                                                  16023

रिक्षासह तीन चाकी                                         1

ट्रॅक्टर                                                        482

दिव्यागांची वाहने                                          13

रोडरोलर                                                   0

क्रेन                                                         7

जेसीबीसह इतर                                        16

एकूण                                               47 हजार 996

                            नवीन वाहन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढीचाही परिणाम

कोल्हापूरमध्ये 1990 च्या दरम्यान, एका गल्लीत एखाद्याकडेच वाहन होते. गेल्या 20 वर्षमध्ये वाहन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक घरांमध्ये दोन ते तीन वाहने झाली आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 60 हजार वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये नवीन वाहने घेणाऱ्यांना परवाना घ्यावा लागतो. यामुळे परवाना घेणाऱ्यांची संख्येत वाढ दिसून येत आहे.

परवाना नसताना वाहन चालविल्यास 5 हजार दंड आहे. दुसऱ्याचे वाहन असल्यास आणि परवाना नसल्यास 10 हजार दंड आहे. तसेच कमी वय असताना वाहन चालविल्यास न्यायालय 25 हजारपर्यंत दंड आकारणी करू शकते. तसेच ज्यांच्या नावावर वाहन नसेल तर त्यांना 3 वर्ष कैद करू शकते. त्यामुळे परवाना घेऊनच वाहन चालवावे. कमी वयाच्या असणाऱ्यांनी वाहन चालवू नये.

                                                                      चंद्रकांत माने, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

                परवान्यासाठी प्रमुख कागदपत्रे

  • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो,
  • निवासी/रहिवासी प्रमाणपत्र,
  •  मेडिकल फिटनेस असल्याचे घोषणापत्र

          वाहन परवानाबाबतची प्रमुख नियमावली

  • कच्चा परवाना सहा महिन्यांच्या मुदतीसाठी असतो.
  • दीर्घ मुदतीच्या परवान्यासाठी प्रथम कच्चा परवाना आवश्यक
  • नियमित वाहनासाठी वाहनचालक परवानाला वयमर्यादा 18 वर्षे पूर्ण असावी.
  • अवजड वाहनचालक परवानासाठी वय वर्षे 20 पूर्ण
  • वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करणे.
  • तात्पुरता परवान्याची मुदत 30 ते 180 दिवस
  • परीक्षकांसमोर वाहन चालविणे, नियमांची माहिती सांगितल्यानंतरच पक्का परवाना

Advertisement
Tags :

.