काकती शिवारातील पिके कुजण्याची भीती
वार्ताहर /काकती
काकती शिवारात गेल्या तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसात भात गाद्यातून पाणी भरून ओसंडून वाहत आहे. भाताची पेरणी झालेले बियाणे कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुबार पेरणीसाठी सूर्यप्रकाशयुक्त उघडीपीची गरज आहे. उघडीप मिळाली नाही तर नापेर राहण्याची शक्यता देखील आहे. अशा संकटात शेतकरीबांधव सापडल्यामुळे चिंतातुर झाला आहे. काकती शिवारात सिंचनाची स्वतंत्र व्यवस्था असलेले शेतकरी भातरोप लागवड करणार आहेत.
सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनी 30 टक्के भातपेरणी केली आहे. यापैकी पहिल्या जूनच्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताची उगवण झाली आहे. मात्र या पावसात कोवळे भाताचे पीक पाण्याखाली गेल्याने कुजण्याची शक्यता आहे. तर काही प्रमाणात विरळ होण्याची शक्यता आहे. भात पेरणीसाठी बियाणे, मशागत, रासायनिक खत आदी मिळून एकरी शेतकऱ्यांनी रुपये दहा हजार खर्च केले आहे. सतत पाऊस असल्याने पेरणी कालावधी संपत आला आहे.