खलिस्तान समर्थकांची भीती, मंदिराचे कार्यक्रम रद्द
कॅनडातील हिंदूंकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त
वृत्तसंस्था/ओटावा
कॅनडाच्या हिंदू मंदिरांमध्ये होणारे दोन कॉन्स्युलर कॅम्प्स सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आले आहे. हे दोन्ही कॅम्प ग्रेटर टोरंटो एरियात चालू आठवड्याच्या अखेरीस आयोजित होणार होते. यातील एक ब्रॅम्पटनच्या त्रिवेणी मंदिर आणि कम्युनिटी सेंटरमध्ये 16 नोव्हेंबर रोजी आयोजित होणार होता, तर दुसरा कॅम्प टोरंटो येथील काली मंदिरात 17 नोव्हेंबर रोजी कॅम्प आयोजित केला जाणार होता.
यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी ब्रॅम्पटनच्या हिंदू सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता, या प्रकारारवून कॅनडातील हिंदू धर्मीयांमध्ये प्रचंड संताप आहे. कॅनडात राहत असलेल्या हिंदूंना खलिस्तान समर्थक सातत्याने त्रास देत आहेत. कॅनडा सरकारने हा प्रकार रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचललेले नाही. याचदरम्यान कॅनडातील हिंदूंना आता मंदिरात जाणे अवघड ठरत आहे.
कॉन्स्युलर कॅम्पचे आयोजन होणार नसल्याची पुष्टी दोन्ही मंदिरांच्या वतीने देण्यात आली आहे. त्रिवेणी मंदिरने कॅम्प रद्द करण्यासंबंधी वक्तव्यही जारी केले आहे. पील रीजनल पोलिसांकडून याविषयी माहिती मिळाल्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिसांनी येथे मोठ्या स्तरावर हिंसक निदर्शने होणार असल्याचा इशारा दिला होता. कॅनडाचे लोक आता येथील हिंदू मंदिरांमध्ये जाण्यासही घाबरू लागल्याचे सांगताना आम्ही अत्यंत दु:खी आहोत असे त्रिवेणी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
हिंदू सभा मंदिरात जे काही घडले, त्यानंतर आम्ही सुरक्षेवरून अत्यंत चिंतेत आहोत. कॅम्प रद्द करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत अवघड होता. एकप्रकारे आम्हाला अप्रत्यक्षपणे कॅम्प रद्द करण्यास भाग पाडण्यात आले असल्याची व्यथा काली बाडी मंदिराच्या ट्रस्टकडून व्यक्त करण्यात आली आहे.
फुटिरवादी गट शिख फॉर जस्टिसने ऑनलाइन नोटीस जारी करत कॉन्स्युलर कॅम्प आयोजित होणाऱ्या दोन्ही मंदिरांची नावे जाहीर केली होती. सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेची जबाबदारी नाकारल्याने ही दोन्ही कॅम्प्स रद्द करावे लागले आहेत. या कॅम्पचे आयोजन पेन्शनर्सना लाइफ सर्टिफिकेट देण्यासाठी केले जाणार होते. वृद्धांना सुविधा देण्यासाठी त्यांच्या घरांच्या आसपास हा कॅम्प आयोजित केला जाणार होता असे टोरंटो येथील भारतीय दूतावासाने सांगितले आहे.
कॅनडाचे पोलीस आणि सरकार हिंदू समुदायाची सुरक्षा करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप विश्व जैन संघटनेने केला आहे. कॅनडाचे पोलीस हिंदूंच्या अधिकारांचे रक्षण करण्याऐवजी खलिस्तान समर्थकांसमोर गुडघे टेकत असल्याचे पाहणे त्रासदायक आहे. हिंसक धमक्यांमुळे मंदिरांवर कार्यक्रम रद्द करण्यासाठी दबाव टाकणे हिंदू लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याला कमकुवत करण्याचा प्रकार असल्याची टीका कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या कॅनडातील शाखेने केली आहे.