गुंजीत हत्तींची धास्ती कायम
भात पिकांचे प्रचंड नुकसान सुरुच : अर्धपक्व भातकापणीची शेतकऱ्यांवर वेळ
वार्ताहर/गुंजी
गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या भागात फिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्याचे सत्र हत्तींकडून अद्याप सुरूच असून, गेल्या चार दिवसापासून हत्तींनी आपले ठाण गुंजीजवळ असलेल्या मेतीतळा शिवाराजवळ मांडले आहे. त्यामुळे या भागातील बिंबेगाळी आणि मेतीतळा शिवारातील भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील शेतकरी कृष्णा खेमांना बिरजे या शेतकऱ्याच्या उभ्या पिकात हत्ती शिरून, खाऊन तुडवून ताव मारून संपूर्ण पीक नष्ट केले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळजवळ 30 ते 40 हजाराचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर कामातगेकर यांच्याही भात पिकाचे हत्तींनी दहा ते बारा पोत्याचे नुकसान केले आहे. कृष्णा बिरजे यांच्या भात पिकात सलग तीन दिवस हत्तीने शिरकाव केल्याने शिवारात केवळ चिखल निर्माण झाला आहे. वर्षभर काबाडकष्ट करून हाता-तोंडाशी आलेले संपूर्ण भात पिक हत्तींनी तुडवून चिखलात घातल्याने धान्याचा एक दाणा देखील सदर शेतकऱ्याला घरी आणता आला नसल्याने सदर शेतकरी उदास झाला आहे.
हत्तींच्या धास्तीने अर्धपक्व भातपीक कापणी
सध्या या भागात अध्यापही जवळजवळ 25टक्के भातकापणी शिल्लक असून हत्तींच्या धास्तीने अनेक शेतकरी अर्धपक्व भातपीक कापणी करीत आहेत. त्यामुळे त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही शेतकऱ्यांनी रांग शिवारातील भातकापणी केली असली तरी शिवारातील ओलाव्यामुळे भातमळणी करता येत नसल्याने भातगंजा रचून ठेवलेल्या आहेत. मात्र अद्याप हत्तींचे वास्तव्य या भागात असल्याने सदर भातगंजावरही हत्तींची नजर पडते की, काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून, येथील शेतकरी वर्ग हत्तींच्या उपद्रवामुळे हवालदिल झाला आहे. तरी अरण्य खात्याने हत्तींचा त्वरित बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे.