कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दांभिकता बाप्पांना आवडत नाही

06:38 AM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

बाप्पा म्हणतात, माझी अनन्यतेनं भक्ती करणारा जरी अडाणी असला तरी, माझ्याशी त्यानं अनन्यता साधलेली असल्याने त्याला आत्मज्ञान आपोआपच प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे तो वेदशास्त्र शिकलेला नसला तरी मी त्याला महापंडितच समजतो. तसं बघायला गेलं तर आपल्या संत मंडळीपैकी बहुतेक लोक जेमतेम शिकलेलेच होते. कित्येकांना तर अक्षरओळखसुद्धा नव्हती. तरीही त्यांच्या रचना बघितल्या, त्यातील सखोल अर्थ लक्षात घेतला तर त्यापुढे एखाद्या पंडिताचे शास्त्रज्ञानसुद्धा फिके पडेल. यावरून बाप्पांच्या म्हणण्याची प्रचीती येते. ज्ञानमार्ग आचरणारा साधक की, भक्तिमार्गाने जाणारा भक्त यापैकी बाप्पांचा आवडता कोण? ह्या वरेण्य राजाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा आपण अभ्यास करतोय. बाप्पा म्हणाले, ज्ञानमार्गी भक्ताचा मी त्वरित उध्दार करतो पण ज्ञानमार्ग आचरण्यास फार कठीण असल्याने त्यातून माझी प्राप्ती होणे हे कर्मकठीण आहे. त्यामानाने भक्तिमार्गाने जाणे सोपे आहे. त्यामध्ये संसारात राहून अनन्यतेनं माझी भक्ती करायची असते. मी दिले आहे त्यात समाधानी राहून, सर्व गोष्टी माझ्यावर सोपवायच्या आणि माझे नित्य स्मरण करत रहायचे असे अनन्य भक्तीचे स्वरूप असते. माझ्या अनेक भक्तांनी या मार्गाने जाऊन माझी प्राप्ती करून घेतली आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनातले प्रमुख ध्येय हे ईश्वराची प्राप्ती करून घेणे हेच असायला हवे किंवा असेही म्हणता येईल की, ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठीच माणसाचा जन्म मिळालेला असतो पण हे लक्षात न घेता लोक समाजाला दाखवण्यासाठी माझी भक्ती करण्याचे नाटक करतात. आपण भक्ती करतोय म्हणजे आपण कुणीतरी महान आहोत असे समाजाने समजावे आणि आपल्याला मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. बाप्पांना असे लोक बिलकुल आवडत नाहीत. म्हणून पुढील श्लोकात ते म्हणतात जो माझी भक्ती न करता केवळ माझी भक्ती करण्याचे नाटक करतो तो खालच्या दर्जाचा समजावा आणि जो श्रद्धेने माझी भक्ती करतो तो उच्च दर्जाचा समजावा.

Advertisement

भजन्भक्त्या विहीनो यऽ स चाण्डालोऽ भिधीयते। चाण्डालोऽपि भजन्भक्त्या ब्राह्मणेभ्योऽ धिको मतऽ ।।8।।

अर्थ-जो भक्तिविरहित माझी उपासना करतो तो खालच्या दर्जाचा असतो. मात्र जो माझी भक्तिपूर्वक उपासना करीत असेल तर तो मला वरच्या दर्जाचा वाटतो.

विवरण-या श्लोकात बाप्पा माणसाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकत आहेत. ते म्हणतात, काही लोक माझी भक्ती करताहेत असं समाजाला दाखवण्यासाठी, भक्ती करण्याचं नाटक करत असतात पण मनातून माझ्याविषयी त्यांच्या मनात बिलकुल भक्तिभाव नसतो. उलट आपण श्रेष्ठभक्त आहोत असा आव मात्र ते चांगला आणतात व स्वत:चा मोठेपणा मिरवत असतात. प्रत्यक्षात मात्र असे भक्त माझ्यादृष्टीने अत्यंत हीन काम करत असतात. आपल्या अवतीभोवती असे कित्येक भोंदूबाबा वावरत असतात. बोलताना ते मोठ्या लंब्याचवड्या बाता मारत असतात. त्यात मी किती मोठा आहे, माझ्यावर देव कसा प्रसन्न आहे हे ते अगदी खुलवून सांगत असतात. अशा पद्धतीने ते लोकांना फसवतात. लोकांच्याकडून त्यांना द्रव्य व मानसन्मानाची अपेक्षा असते. त्यांच्या ह्या गोडगोड बोलण्याला काही लोक सहजी फसतात व त्यांच्या नादी लागतात. ते काय सांगतायत ते करायला ते एका पायावर तयार होतात. ह्यातून अशा भोन्दुना स्वत:चा स्वार्थ साधायचा असतो. काहीकाळ लोक ह्यांच्या बोलण्याला फसतात पण केव्हा ना केव्हा त्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय रहात नाही. मग समजत त्यांची सगळीकडे छी, थू होते. बाप्पाही अशा भोंदूबाबांना अगदी खालच्या दर्जाचे समजतात. त्याउलट जो बाप्पांची मनापासून भक्ती करतो तो बाप्पांच्या दृष्टीने वरच्या दर्जाचा असतो.

 

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article