For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रवणच्या खुनामागे वडील,भावाचाच हात

08:42 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्रवणच्या खुनामागे वडील भावाचाच हात
Advertisement

प्रतिनिधी / वाळपई

Advertisement

नगरगाव येथील श्रवण बर्वे याच्या खुनाला एक वेगळेच वळण लागले आहे. वासुदेव ओझरेकर याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या जबानीतून या खुनाच्यामागे श्रवण याचे वडील देविदास व भाऊ उदय यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. वाळपई पोलिसांनी सविस्तर चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतची माहिती अशी की, नगरगाव-आंबेडे येथील श्रवण देविदास बर्वे याचा चार दिवसापूर्वी खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा गळा दाबून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.  वडील दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र या कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. यासाठी नगरगाव येथील एकूण 15 जणांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर वासुदेव ओझरेकर याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार यामागे देविदास व त्याचे बंधू उदय बर्वे यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भाचे पुरावे वाळपई पोलिसांना प्राप्त झाले. यामुळे देविदास व उदय या दोघांनाही चौकशीसाठी डिचोली येथे पोलिस स्थानकावर बोलविण्यात आले होते. या ठिकाणी सविस्तरपणे चौकशी केल्यानंतर त्यांना वाळपईच्या पोलिस स्थानकावर शनिवारी रात्री आणण्यात आले. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्राकडून प्राप्त झालेली आहे. दरम्यान, आपल्या स्वत:च्या मुलाला व स्वत:च्या भावाला यमसदनी पाठविण्यासाठी वडील व भावाच्या षडयंत्रामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

 आणखी संशयितांना अटक होण्याची शक्यता

नगरगाव येथील श्रवण बर्वे याच्या खूनप्रकरणी शुक्रवारी काही स्थानिकांना चौकशीसाठी पोलिसांनी घेऊन गेले होते. चौकशीअंती संशयित आरोपी म्हणून नगरगाव येथील वासुदेव नकुळ ओझरेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे आणखी संशयितांना अटक होण्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, चार दिवसानंतर वाळपई पोलिसांना याप्रकरणी तपासात गती मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

श्रवण देविदास बर्वे याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्याच्या घरासमोर मुख्य गेटजवळ आढळून आला होता. उत्तरीय तपासणी अहवालामध्ये श्रवण बर्वे याचा गळा दाबून व श्वासोच्छवास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर वाळपई पोलिसांच्या तपासाची चक्रे जोरात फिरू लागली. अधीक्षक अक्षत कौशल यांनी, गोव्यातील अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार करुन तपासाला गती देण्यात येत असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.

चौकशीसाठी 15 जणांना घेतले ताब्यात

दरम्यान, वाळपई पोलिसांनी नगरगाव येथील एकूण 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी त्यांना पर्वरी येथे नेल्यामुळे स्थानिक नागरिकांनी वाळपई पोलिस स्थानकावर येत ठिय्या आंदोलन केले होते. त्यांना सोडण्याची मागणीही केली. पोलिसांनी चौकशी करुन बारा जणांना सोडले मात्र तिघांना अधिक चौकशीसाठी पर्वरी पोलिस ठाण्यावर ठेवण्यात आले होते. यामध्ये वडील वासुदेव ओझरेकर व त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. स्थानिकांनी वाळपई पोलिस स्थानकावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वासुदेव ओझरेकर वगळता त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना रात्री उशिरा सोडण्यात आले.

सखोल चौकशीनंतर वासुदेव ओझरेकरला अटक

शुक्रवारी रात्री वासुदेव ओझरेकर याच्याकडे सविस्तरपणे चौकशी केल्यानंतर तो संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी रात्री त्याला अटक करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकारांना दिली. त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याचेही त्यांनी सांगितले होते.

अनेक जणांना अटक होण्याची शक्यता

दरम्यान, अक्षत कौशल यांनी पत्रकाराना सांगितले की, या प्रकरणी अनेकांच्या जबान्या नोंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे संशयित आरोपी वासुदेव ओझरेकर याच्या चौकशीत या प्रकरणांमध्ये अनेकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सबळ पुराव्यानंतर त्यांनाही अटक करण्यात येणार आहे. यामध्ये किमान सहा जणांना अटक करण्याची शक्यता कौशल यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.