पेठ-सांगली राष्ट्रीय महामार्गाचे भाग्य अखेर उजळले !
इस्लामपूर / युवराज निकम :
पेठ-सांगली रस्ता.. वर्षानुवर्षे 'बिकट वाट वहिवाट' बनून होता. या रस्त्यावर बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी अतोनात पैसा ओतला. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे दारिद्रय संपले. पण या रस्त्याचे दारिद्रय कायम राहत गेले. दोन्ही बाजूस गटारी होत नसल्याने रस्ता काही काळातच जिरुन तो खड्डेमय होत होता. या रस्त्यावर अनेकांचा अपघाती बळी गेला. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गकडे हस्तांतरित झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आवश्यक निधी दिल्याने चौपदरीकरण होवून या महामार्गाचे भाग्य उजळले. अल्पावधीतच या महामार्गाचे दर्जेदार व देखणे काम पूर्णत्वास आले आहे.
पूर्वी हा रस्ता एकेरीच होता. रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ व अन्य झाडे होती. झाडांची कमान मनमोहक होती. उन, वारा, पाऊस या तिन्ही ऋतूतही पादचारी, प्रवासी यांच्यासाठी ही झाडे आधार होती. ऋतू बदलला, माणसं बदलली, पादचारी नावाला उरले. सायकलची जागा मोटारसायकलने घेतली. मोटारसायकलची जागा चारचाकीने घेतली. वाहनांची संख्या वाढली. मार्गावरील वाहतूक वाढली. या रस्त्याचे चौपदरीकरण गरजेचे होते. त्यामुळे हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करण्यात आला. या महामार्गाचा क्रमांक १६६ एच असा असून हा महामार्ग कोकण, पुणे, मुंबई, सोलापूर यांसह अन्य मोठ्या शहरांना जोडणारा दुवा आहे.
या मार्गाला अनेक वर्षे पणवती लागली होती. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतल्यानंतर भूसंपादन, भरपाई यांवरून हा मार्ग काही टप्यात न्यायालयीन वादात अनेक वर्षे अडकला. यामध्ये प्रामुख्याने पेठ ते इस्लामपूर हा टप्पा होता. या वादाचा तिढा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता असेपर्यंत सुटला नाही. लोकप्रतिनिधींनी अनेक बैठका घेतल्या. पण तोडगा निघाला नाही. नॅशनल हायवेकडे हा मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर या मार्गाचे ग्रहण सुटले.
केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे खमके नेते आहेत. सन १९९५ च्या युती शासनाच्या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सांभाळला. त्यांच्या काळात राज्यातील महत्वाच्या रस्त्यांसह मुंबईतील उड्डाणपुले झाली. त्यांच्या खात्याची सर्वच कामे टिकावू व दर्जेदार झाली आहेत. पेठ-सांगली महामार्गाच्या कामाच्या शुभारंभा दरम्यान त्यांनी या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला दर्जाबाबत सज्जड दम दिला होता.
अत्याधुनिक साधनसामग्री व कुशल कामगार यांच्या मदतीने हा महामार्ग जलदगतीने पूर्णत्वास आला आहे. आ. जयंत पाटील हे विरोधी पक्षात असले, तरी गडकरी हे राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आले. यावेळी पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचे जाहीरपणे कौतुक केले होते. त्यावेळी गडकरी यांनी काम पूर्ण करण्याची मुदत जाहीर केली होती. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. सांगलीकडून सुरु केलेला हा मार्ग आता पेठनाक्यावर पोहोचला आहे. काही छोट्या पुलाच्या ठिकाणची किरकोळ कामे, डिग्रज जवळ होणाऱ्या टोल नाक्याजवळील काम वगळता मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.
या महामार्गावर इस्लामपूर व आष्टा ही दोन प्रमुख शहरे आहेत. या दोन्ही शहरात उड्डाणपूल न करता, हा महामार्ग मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील मार्केट टिकून राहण्यास मदत होणार आहे. काही महिन्यांतच काम पूर्णत्वास येवून रितसर या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.
- फुटपाथवरील अतिक्रमणे
इस्लामपूर व आष्टा शहरात महामार्गाच्या दोन्ही बाजूस गटारीवर फुटपाथ करण्यात आली आहेत. हा फुटपाथ पादचाऱ्यांना जाण्यासाठी सुरक्षित आहे. पण व्यावसायिकांनी या फुटपाथवरच बस्तान बसवले आहे. वाहने महामार्गाच्या कडेला उभी केली जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
- शहरांना जोडणाऱ्या मार्गावर उणिवा
इस्लामपूर शहराला जोडणारे कामेरी, वाघवाडी फाटा, ताकारी, बहे हे रस्तेही सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. पण नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्तक्षेपामुळे रस्ता दुभाजक करण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहतुकीला शिस्त नाही. कुठल्याही लेनमधून भरधाव वाहने चालवल्याने अपघातांचे प्रमाण वाढते आहे.