महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जीवघेणे पर्यटन

06:37 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पावसाळ्याची सुरुवात आणि वर्षा पर्यटन यांचा आता मौसम सुरू झाला आहे. आता नजीकच्या काळात जवळच्या धबधब्याकडे लोकांचा ओढा वाढत असतो. कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लोकांना या काळात आपल्या जवळ असंख्य धबधबे आणि निसर्गसंपन्न प्रदेश असल्यामुळे वर्षा पर्यटन खुणावत राहते. मात्र प्रत्येक वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यातील सुटीच्या दिवसांमध्ये अलीकडच्या काळात घडणाऱ्या दुर्घटनेमुळे आता पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांना आनंददायी प्रवासाच्या शुभेच्छा पेक्षाही कोठे जपून जावे याची माहिती देण्याची वेळ आलेली दिसते. रविवारी एकाच कुटुंबातील पाच सदस्य वाहून गेल्याच्या दुर्घटनेने पावसाळ्याच्या प्रारंभीच निसर्गाने इशारा दिलेला आहे असे मानायला हरकत नसावी. पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी धरण येथे गेलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण बुडाल्याची घटना रविवारी घडली आहे. या बुडालेल्यांमध्ये 4 ते 13 वर्षे वयोगटातील तीन मुली, मुलगा आणि महिलेचा समावेश आहे. यातील महिला आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाने शोधला असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. पुणे जिह्यातील हडपसर येथील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काहीजण रविवारी भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी हे सर्वजण गेले. दुपारी ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण सात जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र 4 ते 13 वर्षे वयोगटातील तीन मुली, एक मुलगा तसेच एक महिला वाहून गेली. घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने शोधकार्य सुरू केले. मात्र, मुसळधार पाऊस आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे बचावकार्यात अडचणी येत गेल्या, तर अथक प्रयत्नानंतर शोध पथकाला तिघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढता आले. पण ही दुर्घटना टाळता आली असती. संबंधित कुटुंबाला आधीच अशा धोक्याची जाणीव असती तर त्यांनी आपला आणि लहान मुलांचा जीव धोक्यात घातला नसता. मात्र आता त्याबाबत वाईट वाटून घेऊन हे जीव परत येणार नाहीत. त्यामुळे इतरांनी त्यापासून धडा घेणे गरजेचे ठरते.

Advertisement

नद्यांच्या आणि धबधब्यांच्या संपन्न भागात पर्यटनाला लोक प्राधान्य देतात किंवा किल्ला, डोंगर कपारीत ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी युवावर्ग मोठ्या उत्साहाने जाताना दिसतो. मात्र अशा काळात निर्माण होणारे धोके, निसर्गाचे रौद्र रूप, अचानक वाढणारे पाणी, निसरडे रस्ते, धुके, अपघात प्रवण क्षेत्र अशी स्थानिक माहिती नसलेले लोक हमखास अशा दुर्घटनेचे बळी ठरतात. काही ठिकाणी ठिसूळ झालेले दगड, दरड कोसळून दुर्घटना घडल्याचे पहायला मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना स्थानिक स्थितीची माहिती घेतल्याखेरीज जाणे धोकादायकच ठरते. अर्थात तरुणाईला धाडसासाठी असा प्रदेश खुणावत असतो. त्यांनी त्याला प्रतिसाद देऊ नये असे नाही. पण, आपल्या जीवाचे आणि आपल्या सहकाऱ्यांचे रक्षण करून सुरक्षितपणे असे पर्यटन करणे ही आजची गरज आहे. हे लक्षात घेऊन काळजी घेतली तर दुर्घटना घडत नाहीत हे तितकेच खरे. त्यासाठी खूप अडचणीची ठिकाणे शोधण्यापेक्षा पोहोचण्यासाठी सोपे असलेल्या ठिकाणांवर सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला प्रचंड गर्दी होते हे लक्षात घेऊन आखणी करणे शक्य आहे. तसेच काही अवघड ठिकाणी पोहोचणे आपल्याला शक्य आहे का किंवा तिथे सुरक्षिततेसाठी काही व्यवस्था आहे का यावर नक्की विचार केला जाणे आवश्यक ठरते. त्यादृष्टीने विचार करून वर्षा पर्यटनासाठी किंवा ट्रेकिंगसाठी जाणे शक्य आहे. आपण कुठे चाललो आहोत याची कोणाला तरी माहिती असणे गरजेचे असते. शिवाय ज्या ठिकाणी चाललो तिथला नकाशा, परिसराची माहिती, स्थानिक जाणकार किंवा मदतनीस, माहितगार सोबत असणे गरजेचे असते. अनेकदा गुगल मॅपवर भरवसा ठेवून लोक दूर जंगलात अडकून पडल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. धुके, अंधार यांचा सामना करण्यासाठी साहित्य सोबत ठेवणे, पुरेसे अन्न, औषधे सोबत राखणे गरजेचे असते. या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष होतं. अलीकडच्या काळात सर्वात जास्त दुर्घटना या सेल्फी काढण्याच्या नादात घडताना दिसत आहेत. अनोळखी ठिकाणी जी सावधानता बाळगणे आवश्यक आहे ती न बाळगता त्याकडे दुर्लक्ष करणे आणि सेल्फी घेणे अनेकांना अडचणीत आणणारे ठरत आहे. तो फोटोच त्यांचा अंतिम फोटो ठरतो अशाही दुर्घटना वारंवार घडत आहेत. निसरड्या वाटेवर, दगड निसटल्याने किंवा तोल जाऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हे टाळता येणे शक्य असते. मात्र थोडेसे दुर्लक्ष, अनावश्यक धाडस जीव घेऊन जाते. मागे उरते ती फक्त हळहळ. आपल्या तरुण मुलांनी असे फुकापासरी जीव गमावलेले कोण सहन करू शकेल? मात्र अनेक कुटुंबावर आज ही दुर्देवी वेळ आली आहे. थोड्याशा सावधानतेने हे टाळता येऊ शकते आणि तरुणाईला पर्यटनाचा आनंद देखील मिळू शकतो. मात्र त्यासाठी आवश्यक शिस्त पाळण्याची गरज आहे. स्थानिक ग्राम पंचायती, पोलीस यांनीही हे गांभीर्याने घेऊन आपापल्या भागात तशी सुधारणा केल्यास त्या प्रदेशाची बदनामी देखील थांबेल याचा विचार व्हायला हवा.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article