कॅन्सर पीडितेच्या मुलाकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला
डॉक्टर आयसीयूत दाखल : आरोपीला अटक
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूच्या चेन्नई येथील एका शासकीय रुग्णालयात एका इसमाने डॉक्टरवर चाकूने वार केले आहेत. रुग्णालयात दाखल एका कॅन्सर पीडितेच्या मुलाने डॉक्टरवर हल्ला केला आहे. डॉक्टर बालाजी यांच्यावर चाकूने 7 वार करण्यात आले. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चेन्नईचा रहिवासी विग्नेशला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संबंधित घटता कलैगनार सेंटेनरी रुग्णालयाच्या कॅन्सर वॉर्डमध्ये घडली आहे. डॉक्टर बालाजी हे काम करत असताना विग्नेशने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर विग्नेशने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या घटनेवर निराशा व्यक्त करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी जखमी डॉक्टरावर आवश्यक उपचार करविण्याचा आदेश दिला आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी विस्तृत चौकशी करण्याचा निर्देश दिला आहे. सरकार भविष्यात अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करणार असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.