वेगवान-युवा शतकवीर वैभव सूर्यवंशी
भारतीय युवा संघाची मालिकेत विजयी आघडी
वृत्तसंस्था/ वुरसेस्टर
19 वर्षाखालील वयोगटाच्या सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय युवा संघाने इंग्लंड युवा संघावर 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली. या मालिकेतील झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 55 धावांनी पराभव केला. सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशी वेगवान आणि युवा शतकवीर ठरला. त्याने या सामन्यात 78 चेंडूत 10 षटकार आणि 13 चौकारांसह 143 धावा झोडपल्या.
या चौथ्या सामन्यात इंग्लंड युवा संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकात 9 बाद 363 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंड युवा संघाचा डाव 45.3 षटकात 308 धावांत आटोपला. भारतीय संघातर्फे वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी दमदार शतके झळकाविली.
भारताच्या डावामध्ये वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 24 षटकात 219 धावांची द्विशतकी भागिदारी केली. सूर्यवंशीने जलद 143 धावांचे तर वैभव मल्होत्राने 121 चेंडूत 3 षटकार आणि 15 चौकारांसह 129 धावांचे योगदान दिले. भारतीय युवा संघातील इतर फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाहीत. कुंडूने 33 चेंडूत 1 चौकारासह 23 तर गुहाने 2 चौकारांसह नाबाद 15 धावा केल्या. इंग्लंडतर्फे होमने 63 धावांत 4 तर मॉर्गनने 54 धावांत 3 तसेच मिंटो आणि मेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सूर्यवंशीचा विक्रम
बिहारच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना गुजरात टायटन्स विरुद्ध 35 चेंडूत तुफानी शतक झळकाविले होते. या कामगिरीनंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये वैभवचे नाव गाजू लागले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या युवा कसोटी सामन्यात वैभवने 58 चेंडूत शतक नोंदवले होते. कसोटीमध्ये जलद शतक नोंदविणारा वैभव दुसरा फलंदाज ठरला होता. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने 2005 साली 56 चेंडूत जलद शतक झळकाविले होते. 19 वर्षाखालील युवा विभागात सूर्यवंशीने नवा विक्रम करताना यापूर्वी म्हणजे 2013 साली इंग्लंड विरुद्ध पाकच्या कमरान गुलामने 53 चेंडूत झळकाविलेल्या शतकाचा विक्रम मोडीत काढला. 2022 साली झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युगांडा संघाविरुद्ध भारताच्या राज अंगद बावाने 69 चेंडूत जलद शतक नोंदविण्याचा विक्रम केला होता. 14 वर्षीय वैभवने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात 52 चेंडूत शतक झळकाविले. वेगवान शतक झळकाविणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण क्रिकेटपटू असून त्याने बांगलादेशच्या नजमूल हुसेन शांतोला मागे टाकले आहे. वैभवने आपल्या वयाच्या 14 वर्षे 100 व्या दिवशी हा विक्रम केला आहे. तर बांगलादेशच्या शांतोने 14 वर्षे 241 व्या दिवशी जलद शतक नोंदविण्याचा पराक्रम केला होता. बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी वैभव सूर्यवंशीचे खास अभिनंदन करुन त्याला भविष्या काळासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात फ्लिनटॉपने 91 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 107 धावा झळकाविल्या. सलामीच्या डॉकिन्सने 99 चेंडूत 10 चौकारांसह 67 तर मूर्सने 41 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 52 धावा केल्या. भारतातर्फे नमन पुष्पकने 63 धावांत 3 तर अंबरिषने 55 धावांत 2 तसेच देवेंद्रने आणि चौहान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - भारत 50 षटकात 9 बाद 263 (वैभव सूर्यवंशी 143, विहान मल्होत्रा 129, कुंडू 23, गुहा नाबाद 15, होम 4-63, मॉर्गन 3-54, मिंटो आणि मेस प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 45.3 षटकात सर्वबाद 308 (फ्लिनटॉप 107, डॉकिन्स 67, मूर्स 52, नमन पुष्पक 3-63, अंबरिष 2-55, देवेंद्रन आणि कनिष्क चौहान प्रत्येकी 1 बळी).