तिसऱ्या कसोटीतही फास्ट बॉलरचा दबदबा
नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक : भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीला 14 डिसेंबरपासून सुरुवात
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मधील तिसरी कसोटी 14 डिसेंबर म्हणजे शनिवारपासून ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर होणार आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर अॅडलेड येथे झालेल्या पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक करत 10 विकेट्सनी विजय मिळवला. आता सर्वांची नजर तिसऱ्या कसोटीवर आहे. विशेष म्हणजे, ब्रिस्बेनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजासाठी पोषक असल्यामुळे या कसोटीत कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. गाबा कसोटीसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवरील खेळपट्टी जलद गोलंदाजांसाठी स्वर्ग असणार आहे. येथे जलद गोलंदाजांना फार मदत मिळते. चेंडूला चांगली उसळी मिळते. बाऊंसर चेंडूवर चांगला शॉट मारता येतो आणि त्याच चेंडूवर विकेट देखील जाऊ शकते. अर्थात, पर्थ, अॅडलेडप्रमाणेच ब्रिस्बेन कसोटीतही वेगवान गोलंदाजांचा वरचष्मा पहायला मिळण्याचे संकेत आहेत. पहिल्या दोन्ही कसोटीत वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली असून या जोरावर भारत व ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ही मालिका अतिशय महत्वपूर्ण असल्याने टीम इंडियाला ही कसोटी जिंकणे अनिवार्य आहे.
गाबावर 68 सामने
ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 68 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 26 तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 27 सामने जिंकले आहेत. ब्रिस्बेनमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 327 धावांची आहे. दुसऱ्या डावात 317 धावा, तिसऱ्या डावात 238 धावा आणि चौथ्या डावात 161 धावा केल्या आहेत. यामुळे फास्ट बॉलरसाठी नंदनवन असणाऱ्या या खेळपट्टीवर अर्थातच नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरेल, यात शंकाच नाही.
टीम इंडिया 2021 मधील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील
भारतीय संघाने 2021 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया साधली होती. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या जादुई खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव केला. 32 वर्षांनंतर ब्रिस्बेनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात कोणत्याही संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यंदाही टीम इंडिया इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
बुमराहवर मदार, वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळण्याचे संकेत
वेगवान गोलंदाजासाठी पोषक असणाऱ्या गाबाच्या खेळपट्टीवर गवत असणार आहे. यामुळे चेंडूला चांगला बाऊन्स मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे टीम इंडियाची मदार पुन्हा जसप्रीत बुमराह, सिराजवर असेल. पहिल्या दोन्ही कसोटीत बुमराह प्रभावी ठरला आहे. सातत्याने विकेट घेत त्याने टीम इंडियाला यश मिळवून दिले आहे पण दुसरीकडे बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. सिराजने काही बळी घेतले आहेत पण यामध्ये सातत्य नाही. युवा गोलंदाज हर्षित राणालाही आपला प्रभाव दाखवता आलेला नाही. यामुळे गाबाच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना सातत्य राखण्यासह दर्जेदार कामगिरी करावी लागेल. याशिवाय, अॅडलेड कसोटीत अश्विनला संधी मिळाली पण तोही फारसा चालला नाही. यामुळे तिसऱ्या कसोटीत अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात मिळणार असल्याचे संकेत आहेत. सुंदरच्या रुपाने फलंदाजी व गोलंदाजीत मोठा पर्याय रोहितकडे उपलब्ध आहे. रविंद्र जडेजाला पहिल्या दोन कसोटीत स्थान मिळालेले नाही. तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या रुपाने रोहितकडे मोठी उपलब्धी आहे.
टीम इंडियाचा कसून सराव
अॅडलेड कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता उभय संघात 14 डिसेंबरपासून तिसरी टेस्ट खेळवली जाणार आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांना विश्रांती दिली नाही. मंगळवारी सकाळी अॅडलेडमधून एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये विराट आणि रोहित जोरदार सराव करताना दिसत आहेत. यावेळी गंभीरची या दोघांवर बारीक नजर होती. विराट आणि रोहित व्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि केएल राहुल देखील प्रशिक्षक गौतम गंभीरच्या देखरेखीखाली अॅडलेडमध्ये घाम गाळताना दिसले.
वेगवान गोलंदाज जोस हॅजलवूडचे पुनरागमनाचे संकेत
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हॅजलवूड दुखापतीमुळे अॅडलेड कसोटीत सहभागी झाला नव्हता. पण, कसोटी मालिकेत कांगांरुनी 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर उभय संघातील तिसरा सामना दि. 14 पासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. यातच हॅजलवूड तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हॅजलवूडने दुखापतीतून सावरण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. साइड स्ट्रेनने त्रस्त असलेल्या या वेगवान गोलंदाजाने मंगळवारी त्याच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी सामन्यासारख्या परिस्थितीत 2 लांब स्पेल टाकले. मात्र, तिसऱ्या कसोटीतील त्याचा सहभाग येत्या 24 तासात ठरवला जाईल, असे त्याने स्पष्ट केले. माझ्या शरीराच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल. जर मला पूर्णपणे बरे वाटले, तरच मी खेळण्याचा निर्णय घेईन, असे हॅजलवूडने माध्यमांशी बोलताना सांगितले.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. उभय संघातील हा सामना ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येईल. पण, या तिसऱ्या सामन्याआधीच चौथ्या सामन्याच्या सर्व तिकीटे हाऊसफुल झाल्याचा बोर्ड मेलबर्नमध्ये लागला आहे. उभय संघातील चौथा सामना अर्थात बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. तब्बल 90 हजार क्षमतेचे हे स्टेडियम असून पहिल्या दिवसाची सर्व तिकीटे विकली गेली असल्याची माहिती मेलबर्न क्रिकेट प्रशासनाने दिली आहे. दुसरीकडे, अॅडलेड येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात प्रेक्षकांनी मोठी गर्दी करत विक्रम रचला होता. अडीच दिवसात तब्बल 1,35,012 प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजेरी लावली होती.