ऑस्ट्रेलियाकडून भारतीय महिला संघाचा व्हाईटवॉश
अॅनाबेल सुदरलॅन्ड ‘मालिकावीर व सामनावीर’, मानधनाचे शतक वाया
वृत्तसंस्था / पर्थ
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एकतर्फी वनडे मालिका गमवावी लागली. यजमान ऑस्ट्रेलियाने बुधवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताचा 83 धावांनी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सुदरलॅन्डला ‘मालिकावीर आणि सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळाला. या सामन्यात भारताच्या स्मृती मानधनाचे शतक वाया गेले.
या मालिकेमध्ये तिनही सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर आपले निविर्वाद वर्चस्व राखले. या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 6 बाद 298 धावा जमवित भारताला विजयासाठी 299 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताचा डाव 45.1 षटकात 215 धावांत आटोपला. सलामीच्या स्मृती मानधनाने शानदार शतक (105) झळकविले. पण तिला संघातील इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये अॅनाबेल सुदरलॅन्डने 95 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 110 तर गार्डनरने 64 चेंडूत 5 चौकारांसह 50, कर्णधार मॅकग्राने 50 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 56, लिचफिल्डने 33 चेंडूत 4 चौकारांसह 25, व्हॉलने 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. बेथ मुनी 10 धावांवर बाद झाली. भारतातर्फे अरुंधती रेड्डी ने 26 धावांत 4 तर दिप्ती शर्माने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 4 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. सुदरलॅन्ड आणि गार्डनर यांनी पाचव्या गड्यासाठी 96 धावांची भागिदारी केली. गार्डनर बाद झाल्यानंतर सुदरलॅन्डने कर्णधार मॅकग्रासमवेत सहाव्या गड्यासाठी 122 धावांची शतकी भागिदारी केली. सुदरलॅन्डने 93 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह शतक झळकविले. मॅकग्राने 44 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने तर गार्डनरने 60 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाला या सामन्यात फलंदाजीचा सूर मिळाला. तिने 109 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 105 धावा झळकविल्या. देवोलने 64 चेंडूत 4 चौकारांसह 39, कर्णधार कौरने 22 चेंडूत 12 तर रॉड्रिग्जने 11 चेंडूत 1 षटकारासह 16 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचे तळाचे फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. मानधना आणि देवोल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 118 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावामध्ये 2 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डनर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 30 धावांत 5 तर शूटने 26 धावांत 2 तर किंगने 27 धावांत 2 आणि सुदरलॅन्डने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धाफलक: ऑस्ट्रेलिया 50 षटकात 6 बाद 298 (सुदरलॅन्ड 110, मॅकग्रा नाबाद 56, गार्डनर 50, लिचफिल्ड 25, व्हॉल 26 अवांतर 15, अरुंधती रे•ाr 4-26, दिप्ती शर्मा 1-77), भारत 45.1 षटकात सर्वबाद 215 (स्मृती मानधना 105, देवोल 39, कौर 12, रॉड्रिग्ज 16, अवांतर 17, गार्डनर 5-30, किंग 2-27, सुदरलॅन्ड 1-34, शूट 2-26)