विषारी सापांची ‘शेती’
‘शेती’ कशाची केली जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत आहे, अशी प्रत्येकाची समजूत आहे. शेती तांदूळ, गहू, डाळी, भाजीपाला इत्यादी पिकांची केली जाते. पण सापांची शेती आणि ती सुद्धा विषारी सापांची, असते ही कल्पनाही करणे आपल्यासाठी अवघड आहे. तथापि, या जगात एक असे स्थान आहे की जिथे खरोखरच विषारी सापांची शेती केली जाते. ज्या सापांना पाहून माणसे थरथर कापतात, त्या सापांचे शेकडोंच्या संख्येने उत्पादन या शेतीत घेतले जाते.
आता ही शेती कशी केली जाते, या संबंधीची उत्सुकता मनात जागृत झाल्याशिवाय रहात नाही. हे स्थान व्हिएतनाम या देशात असून त्याला ‘डोंग टॅम स्नेक फार्म’ या नावाने ओळखले जाते. हे केवळ सापांचे प्रजजन केंद्र नाही, हे समजून घेणे महत्वाचे आहे. कारण अशी केंद्र जगात अनेक आहेत. सापाच्या विषाला उतारा म्हणून जे औषध निर्माण केले जाते, ते सापांच्या विषापासूनच केलेले असते. त्यामुळे अशी औषधे निर्माण करणाऱ्या केंद्रांमध्ये विषारी साप पाळले जातात. पण व्हिएतनाममधील ही शेती त्यांच्यापेक्षा बरीच भिन्न आहे.
येथे सर्पिणींनी अधिक अंडी घालावीत, म्हणून विषेश व्यवस्था करण्यात आली आहे. सर्प आणि सर्पिणी यांच्यासाठी ‘रोमँटिक’ वातावरण या शेतात निर्माण केले जाते, जेणेकरुन त्यांची मिलानोत्सुकता वाढावी. या प्रक्रियेतून अधिक अंड्यांची निपज होते, असा ही शेती करणाऱ्यांचा अनुभव आहे. अधिकाधिक विषारी साप जन्मावेत, यासाठी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. तसेच सर्पिणींनी घातलेली अंडी नष्ट होऊ नयेत किंवा वाया जाऊ नयेत म्हणूनही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक सर्पीण एका वेळेला मोठ्या संख्येने अंडी देते. तथापि, सर्व अंड्यांमधून पिले बाहेर येत नाहीत. तसेच आली तरी सर्व जगत नाहीत. त्यामुळे एकंदर सापांची निपज कमीच असते. मात्र या शेतीस्थानी अंड्यांमधून बाहेर आलेले साप जास्तीत जास्त प्रमाणात जगावेत, म्हणून विशेष प्रयत्न केले जातात. या शेतीला भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. येथे आल्यावर सर्वत्र सापच साप दिसतात. हा एक अद्भूत अनुभव असतो, अशी प्रतिक्रिया ही शेती बघितलेल्या अनेकांनी व्यक्त केली आहे. एकंदर, अशा प्रकारचा हा जगातील एकमेव वैशिष्ट्यापूर्ण सर्पशेतीप्रकल्प आहे, असे मानले जात आहे. ही शेती करण्याचे कारण असे सांगितले जाते, की विषारी सापांना विविध कारणांसाठी जगभरात मोठी मागणी आहे. ती या शेतीतून पुरविली जात आहे.