हुबळीतील फार्महाऊस बनावट दारूचा अड्डा
5 लाख रुपयांचे साहित्य जप्त : वेगवेगळ्या ब्रँडची हुबेहूब बनावट दारू
बेळगाव : छब्बी (ता. हुबळी) येथील एका फार्महाऊसवर छापा टाकून बेळगाव येथील अबकारी अधिकाऱ्यांनी बनावट दारू तयार करणारा अड्डा उघडकीस आणला आहे. या अड्ड्यावरून सुमारे 5 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ब्रँडची दारू तयार करून बॉटलिंग केले जात होते. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त मंजुनाथ वाय. व सहआयुक्त एफ. एच. चलवादी यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, बसवराज मुडशी, रवी होसळ्ळी, लिंगराज आदी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. छब्बी येथील फार्महाऊसवर बनावट दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच बुधवारी अचानक छापा टाकून मोठ्या प्रमाणात कच्चामाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या फार्महाऊसवरून संदीप व जितुरीसह तिघा जणांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. 25 बॉक्स डीएसपी ब्लॅक व्हिस्की, 12 हजार बाटल्या इम्पिरियल ब्लू, एक हजारहून अधिक लेबल, बॉटलिंगसाठी सज्ज असलेल्या एक हजार बाटल्या, 2 हजारहून अधिक खाली बाटल्या, 2 हजार खाली बॉक्स, अडीचशेहून अधिक बूच, 50 लिटर तयार दारू, 10 कॅन, शंभर लिटर पाणी जप्त केले आहे. वाईन शॉपमध्ये दारूची बाटली खरेदी केल्यानंतर लेबलसह कॅप, त्याची सुरक्षा साधने खऱ्या बाटल्यांप्रमाणेच या ठिकाणीही वापरण्यात आली आहेत. अबकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक कच्चामाल मुंबईहून मागविण्यात येत होता. वेगवेगळ्या ब्रँडच्या नावे दारू तयार करून बॉटलिंग करून हुबेहूब खऱ्या बाटल्यांप्रमाणेच ते तयार केले जात होते.
फार्महाऊस कोणाचे?
बनावट दारू तयार करणारे संपूर्ण व्यवस्था असलेले फार्महाऊस कोणाचे? या कारखान्यात तयार झालेली दारू कोणत्या जिल्ह्यात विकण्यात येत होती? आदींविषयी तपास करण्यात येत असल्याचे अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव येथील अबकारी विभागात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.