For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृगाने टेकले हात, आर्द्रा देईल का साथ?

10:46 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृगाने टेकले हात  आर्द्रा देईल का साथ
Advertisement

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत : खरिपातील पिके घ्यायची कशी? : नदी-नाले अद्याप कोरडेच, पिके वाया जाण्याची भीती

Advertisement

आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी 

यंदा ऐन खरीप हंगामातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके घ्यायची कशी याची चिंता बळीराजाला लागूली आहे. काही शेतशिवारात भातपेरणी केली आहे. बहुतांशी प्रमाणात रताळी लागवड करायची आहे. पावसाअभावी नदी-नाले कोरडेच आहेत. दि. 7 जूनपासून मृग नक्षत्राला सुऊवात झाली, पण या दरम्यान म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आता दोन दिवसांपासून आर्द्रा नक्षत्राला सुऊवात झाली. या दोन दिवसातही पावसाची उघडीपच दिसून आली. त्यामुळे ‘मृगाने टेकले हात, आर्द्रा देईल का साथ?’ असे विचारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बळीराजाच्या म्हणण्यानुसार सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस हवा. शेत शिवारामध्ये पाणी साचलेले पाहिजे. नदी नाले अगदी खळखळून वाहिले पाहिजेत. अशी परिस्थिती या कालावधीत असायला हवी. मात्र सद्यपरिस्थिती पाहिल्यास नदी नाले अद्यापही कोरडेच आहेत. शेत शिवारामध्ये पाणी नाही. पावसाच्या उघडीपीप्रमाणे खरीप हंगामातील बरीचशी कामे खोळंबलेली आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनलेला आहे.

Advertisement

मशागतीची कामे पूर्ण

यंदा तालुक्यात वळिवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती.त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी व इतर पिकांसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबलेली होती. वळीव पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांनी आपापल्या शेत शिवारामध्ये मशागतीची कामे जोमाने सुरू केली. दरवर्षी शेतकरी 20 मे पासून धूळवाफ पेरणीला सुऊवात होते. यंदा मात्र याच काळात मान्सूनपूर्व पाऊस झाला त्यामुळे धूळवाफ पेरणी लांबणीवर पडली. दि. 7 जूनच्या उत्तर रात्रीपासून मृग नक्षत्राला सुऊवात झाली. या नक्षत्राच्या प्रारंभी एक-दोन दिवस थोडा बहुत पाऊस झाला. त्यामुळे बळीराजांच्या आशा पल्लवीत झाल्या. या दरम्यान भात पेरणी व इतर कामांना सुऊवात केली. मात्र मृग नक्षत्र काळात म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. दि. 21 रोजीच्या रात्रीपासून आर्द्रा नक्षत्राला सुऊवात झाली. चार दिवस झाले तरीही पावसाने उघडीपच दिलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढलेली आहे.

मशागतीसाठी पाणी आवश्यक

काही प्रमाणात शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेली आहे. भाताची उगवण झाली आहे.कोळपणीची कामे सुरू आहेत तर बहुतांशी शेत शिवारामध्ये भात रोप लागवड करायची आहे. रोप लागवडीसाठी शेतशिवारात मशागतीसाठी पाणी साचणे आवश्यक आहे. पाणी साचल्यास रोप लागवडीसाठी मशागत करता येते.तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, येळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, नावगे, बामणवाडी, कुट्टलवाडी, बाळगमट्टी, झाडशहापूर, मच्छे, संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले या भागात रताळ्याचे पीक अधिक प्रमाणात घेण्यात येते. पावसाने उघडीप दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रताळी लागवडीसाठी बांध (मेरा) तयार करून घेतलेल्या आहेत. केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी रताळी वेल लागवड केलेली आहे.पावसाच्या दिवसातच कडक ऊन असल्यामुळे लागवड केलेली रताळी वेल सुकून जाण्याच्या मार्गावर आहे. अद्यापही 90 टक्के रताळी वेळ लागवड शिल्लक आहे.

नाचणा तरूची उगवण

भात, भुईमूग, सोयाबीन, बटाटा, रताळी, नाचणा आदी खरीप हंगामात तालुक्यात प्रामुख्याने पिके घेण्यात येतात. यातील सोयाबीन या एकमेव पिकाला अधिक पावसाची गरज भासत नाही तर उर्वरित पिकांसाठी दमदार पाऊस हवाच. पश्चिम भागात नाचणा लागवड ही चांगल्या प्रमाणात केली जाते. नाचणा लागवडीच्या कालावधीत मात्र मुसळधार पावसाची गरज आहे.

वेळेत पाऊस न झाल्यास खरीप पिके वाया

भागातील अगदीच मोजक्यात शेतकऱ्यांनी रताळी वेल लागवड केलेली आहे. पण पावसाअभावी ती वेल वाळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रताळी वेल पुन्हा लावण्याची वेळ येणार का काय याची चिंता आहे. अजून बऱ्याच शिवारातील रताळी वेल आणि भात रोप लागवड करायची आहे. पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगाम साधायचा कसा याची आम्हा शेतकऱ्यांना चिंता लागून राहिलेली आहे. बी बियाणासाठी बरेच पैसे खर्च केले आहेत. वेळेत पाऊस झाला नाही तर खरीप पिके घेता येणार नाहीत.

-अरुण गुरव, बेळगुंदी

शिवारात विहिरींनी अद्याप तळ गाठलेलेच

बेळगाव तालुक्यात एक मार्कंडेय नदी आणि दुसरी पश्चिम भागातील मुंगेत्री नदी अशा दोन नद्या आहेत. दरवर्षी या कालावधीत या नद्या प्रवाहित झालेल्या असतात. सध्या दोन्ही नद्या कोरड्या आहेत. उन्हाळ्यात शेत शिवारातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीने तळ गाठला होता. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली होती. सध्याची परिस्थिती पाहता पाऊस कधी येईल याची चिंता लागलेली आहे. योग्य हंगाम साधण्यासाठी निसर्गाची साथ हवी. तेव्हाच बळीराजा शेती करू शकतो.

- मारुती आंबोळकर, वाघवडे

Advertisement
Tags :

.