For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थकीत ऊसबिलावरून शेतकरी संघटना आक्रमक

11:06 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
थकीत ऊसबिलावरून शेतकरी संघटना आक्रमक
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांची उद्या घेणार भेट : दुष्काळ भरपाई देण्यास दिरंगाई

Advertisement

बेळगाव : दुष्काळामुळे आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षित भरपाई देण्यात आलेली नाही. असे असताना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांकडून उसाची बिले देण्यात आली नसल्याने शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंबंधी दि. 19 रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतला आहे. पावसाअभावी जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनालाही याची पूर्णपणे जाणीव आहे. राज्य सरकारकडून दुष्काळ भरपाई देण्यामध्ये दिरंगाई धोरण अवलंबले आहे.शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार भरपाई देण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दुष्काळ परिस्थिती उलटली असली तरी शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

दुष्काळ परिस्थितीमध्ये काबाडकष्ट करून कारखान्यांना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांकडून बिले देण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील बैलहोंगल, संकेश्वर, बेळगावसह आठपेक्षा अधिक साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची बिले थकविली आहेत. कोट्यावधीची बिले कारखान्यांकडे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये कारखान्यांकडून शेतकऱ्यांना बिले अदा केली जात नसतील तर शेतकऱ्यांनी कोणाकडे जावे? असा प्रश्नही शेतकरी संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement

अन्यथा तीव्र आंदोलन 

ऊसपुरवठा केलेल्या साखर कारखान्यांनी त्वरित शेतकऱ्यांची बिले न दिल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. यासाठी दि. 19 रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. साखर आयुक्तांसह कारखान्यांच्या प्रतिनिधींना या बैठकीला बोलावले जाणार आहे. या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

उसाचे बिल त्वरित द्या

दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. यातच शासनाकडूनही अपेक्षित भरपाई दिलेली नाही. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक गरज आहे. कारखान्यांकडे असणारे उसाचे बिल त्वरित देण्यात यावे, यासाठी दि. 19 रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे.

- प्रकाश नाईक (शेतकरी नेते)

Advertisement
Tags :

.