देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची सांगलीत धडक
अखिल भारतीय किसान सभेकडुन सोमवारी मोर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 102 गावांतील देवस्थान इनाम जमिनीचे लिलाव लावण्याची हालचाल सुरु केली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र देवस्थानची जमीन कसणाऱ्या एकाही शेतकऱ्याला बेदखल होवू देणार नसल्याचा निर्धार अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. यासाठी किसान सभेने सांगली येथे मोर्चाचे नियोजन केले आहे.
याप्रश्नी सोमवार 8 रोजी सांगली येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथून मोर्चा सुरुवात होणार आहे. मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. तरी सातबाराला नाव लागण्यासाठी व वारस नोंद होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगलीतील मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष उदय नारकर यांनी केले आहे.