‘जय किसान’ विरोधात पुन्हा एल्गार
शेतकऱ्यांचे राणी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन : नोटीस बजावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
बेळगाव : खासगी जय किसान भाजी मार्केट पूर्णपणे बंद करून इमारत परवानाही रद्द करण्याच्या मागणीसाठी गुऊवारी पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रीय रयत संघटनेच्या नेतृत्त्वाखाली विविध जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. कनकदास सर्कलपासून राणी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन करत त्वरित मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्य सरकारकडून खासगी जयकिसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला. यानंतर प्रशासनाकडून याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र महापालिकेकडून इमारत परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात न आल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला. ते त्वरित जय किसान भाजी मार्केट इमारत परवाना रद्द करण्याची मागणी करत होते. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासन देण्यात येत होते. यामुळे गुऊवारी शेतकऱ्यांनी दृढनिश्चय करून त्वरित मागण्या मान्य करण्याचा निर्धार करत आंदोलन हाती घेतले.
विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग
कनकदास सर्कलपासून सुऊवात झालेल्या मोर्चामध्ये विविध जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता. मोर्चात बैलगाड्यांचाही समावेश करण्यात आला होता. राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेमध्ये ऊपांतर झाले. यावेळी शेतकरी जय किसान भाजी मार्केट पूर्णपणे बंद करण्याची आग्रही मागणी करत सर्कलमध्ये ठाण मांडून सुमारे दोन ते तीन तास आंदोलन केले. यामुळे राणी चन्नम्मा सर्कलमधील चारी बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मोहम्मद रोशन-पोलीस आयुक्तांची आंदोलनस्थळाला भेट
काही वेळानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी शेतकरी आजच आम्हाला जय किसानबाबत निर्णय द्या, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांकडे धरला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्यासाठी काहीवेळ देण्याचा विनंती करत जवळच सार्वजनिक हॉस्पिटल असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना समस्या होत आहेत. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा करून देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठाण मांडले.
गुरुवारी रात्रीपर्यंत नोटीस बजावणार
सायंकाळी 6 च्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात जय किसान भाजी मार्केटबाबत गुरुवारी सुनावनी पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र आपण गुरुवारी रात्रीपर्यंत जय किसान भाजी मार्केटला परवाना रद्दची नोटीस बजावण्याचे आश्वासन दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
दै. ‘तरुण भारत’ने गुरुवारी आपल्या अंकात ‘आंदोलनांच्या झुंडी अन् सामान्यांची कोंडी!’ या मथळ्याखाली आंदोलनामुळे सार्वजनिकांना होणाऱ्या समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राणी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. कारण राणी चन्नम्मा सर्कल परिसरात सिव्हिल हॉस्पिटलसह विविध हॉस्पिटल्स आहेत. आंदोलनाचा परिणाम रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. तसेच या मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये असून विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यांचा त्रास होत असून मार्ग बंद होत असल्याने त्यांना समस्यांचाही सामना करावा लागत आहे. यासाठी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
चन्नम्मा चौक आंदोलनप्रकरणी जय किसान पदाधिकाऱ्यांवर एफआयआर
जय किसान भाजी मार्केट वाचवण्यासाठी येथील राणी चन्नम्मा चौक परिसरात तब्बल सहा तास आंदोलन केलेल्या मार्केटच्या पदाधिकाऱ्यांवर येथील खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी ही माहिती दिली आहे. प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जय किसान मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवार दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत चन्नम्मा सर्कल परिसरात निदर्शने करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना या आंदोलनाचा त्रास झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, सिव्हिल हॉस्पिटलला जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. अचानक मार्ग बदलामुळे शाळकरी मुलांनाही त्रास झाला. त्यामुळेच यासंबंधी पदाधिकाऱ्यांवर फिर्याद दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाचा व्हिडिओ बघून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
चन्नम्मा सर्कल हा शहराच्या हृदयभागात आहे. या परिसरात आंदोलन करताना आपल्यामुळे बेळगावकरांना त्रास होऊ नये याची प्रत्येकाने भान बाळगावे. 5 ते 15 मिनिटे आंदोलनासाठी घेतले तर ठीक आहे. अनेक तासांसाठी मुख्य रस्ता बंद करावा लागला तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. मंगळवारी सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अनेक अडथळे पार करावे लागले. चन्नम्मा सर्कलमधील आंदोलनामुळे बेळगावकरांना त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊन पुढील केडीपी बैठकीत या विषयावर चर्चा करून आंदोलनांसाठी स्वतंत्र स्थळ निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. इतर अधिकारी, मंत्री, आमदारांशी चर्चा करून 1 जानेवारी 2026 पासून आंदोलनांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
आंदोलकांसाठी स्वतंत्र जागा आवश्यक
चन्नम्मा सर्कलमधील आंदोलनांमुळे सामान्य नागरिकांना कसा फटका बसतो. विद्यार्थी, नागरिक यांना किती त्रास सहन करावा लागतो. याविषयी तरुण भारतने गुरुवारी ‘आंदोलनांच्या झुंडी अन् सामान्यांची कोंडी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. विविध मागण्यांसाठी होणारे आंदोलन चिघळले तर अनेक तासांपुरते चन्नम्मा सर्कलवरील वाहतूक बंद ठेवावी लागते. त्यामुळे रुग्ण, विद्यार्थी यांच्याबरोबरच सर्वसामान्यांनाही त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊन आता आंदोलकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे.
जय किसानच्या दाव्याला स्थगिती नाहीच,न्यायालयाने निकाल ठेवला राखून : दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
कृषी पणन संचालकांनी जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना रद्द करण्यात आल्याने या विरोधात स्थगिती मिळविण्यासाठी जय किसानतर्फे उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात रिटपिटीशन दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणी झाली. वादी-प्रतिवादींच्या वकिलांनी जवळपास 3 तास जोरदार युक्तिवाद केला. पण न्यायालयाने स्थगिती दिली नाही. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून, लवकरच तो निकालात काढला जाणार आहे. स्थगिती न मिळाल्याने जय किसानला हा एक धक्काच मानला जात आहे.
अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत जय किसान भाजी मार्केटचा लँड युज आपोआप रद्द झाल्याचा आदेश यापूर्वीच बुडा आयुक्तांनी जारी केला आहे. या पाठोपाठ कृषी पणन खात्यानेही जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना रद्द केल्याने तेथील व्यापारावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. कृषी पणन संचालकांनी जारी केलेल्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी जय किसानतर्फे उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात रिटपिटीशन दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होणार होती. पण ती सुनावणी पुढे ढकलल्याने त्यावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली.
एपीएमसी मार्केटतर्फे अॅड. आनंद मंडगी, अॅड. नितीन बोलबंडी, अॅड. शोभा एच. व जय किसान भाजी मार्केटतर्फे त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. वादी-प्रतिवादींच्या वकिलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. पण कृषी पणन संचालकांनी व्यापार परवाना रद्दच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली नाही. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून लवकर तो निकालात जाणार आहे.