जय किसान मार्केटविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
फसवणूक होत असल्याची तक्रार : परवाना रद्दची मागणी
बेळगाव : बेळगाव शहरात बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या खासगी जय किसान मार्केटवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सोमवार दि. 16 रोजी सुवर्णसौधसमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलनात शेकडो शेतकरी पुरुष व महिलांचा सहभाग होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. बेळगाव शहरात काही वर्षांपूर्वी जय किसान मार्केट सुरू केले आहे. अनधिकृतपणे परवाना मिळवून मार्केट चालविण्यात येत आहे. कृषी बाजार खात्याकडून परवानगी न घेता मार्केट सुरू आहे. या खासगी मार्केटमध्ये शेती उत्पादनांना योग्य दर देण्यात येत नाही. काटामारीचा प्रकार सर्रास घडतो. शेतकऱ्यांकडून 10 टक्के पर्यंत कमिशन घेण्यात येते. एकूणच जय किसान खासगी मार्केटकडून शेतकऱ्यांबरोबर सरकारचीही फसवणूक होत आहे. त्यामुळे या खासगी मार्केट विरोधात सरकारने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी संघटनांतर्फे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.