राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्ताकामाला शेतकऱ्यांचा विरोध : काम रोखले
कोणतीही सूचना नसताना रस्त्याची रुंदी वाढवण्याचा प्रयत्न : जमीन अधिग्रहण करून काम हाती घेण्याची मागणी
खानापूर : राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या शहरांतर्गत जाणाऱ्या महामार्गाच्या विकासासाठी एकात्मिक विकास योजनेतून 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. कामाची सुरुवात हेस्कॉम कार्यालयापासून ते नदी पुलापर्यंत झाले आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता वाढवल्याने शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या कामाला विरोध केला असून सोमवारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम बंद पाडले आहे. जोपर्यंत अधिकृत जमीन अधिग्रहण करण्यात येणार नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शहरांतर्गत रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. शहरातील हा मुख्य रस्ता असून हा रस्ता नंदगड, हल्याळ तसेच गोव्यासाठी संपर्क रस्ता आहे.
तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हेस्कॉम कार्यालयापासून ते नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूला रस्ता रुंद करण्यासाठी नियोजन सुरू केल्याने येथे जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी रस्त्याचे काम अडवले. यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कंत्राटदार आणि शेतकरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी उपस्थित शेतकरी विनायक सावंत, राहूल सावंत, विनायक चव्हाण, रामा चव्हाण, गोपाळ चौगुले, पांडुरंग चौगुले, श्रावण चौगुले, जोतिबा चौगुले, संदीप देसाई, जोतिबा चव्हाण यासह इतर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तुम्ही कोणतीही नोटीस अथवा सूचना नसताना आमच्या जमिनीवर वाढीव रस्ता का करत आहात, म्हणून धारेवर धरले.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी थातूरमाथूर उत्तरे देवून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेंतकऱ्यांनी या संपूर्ण रस्त्याचा आराखडा दाखवा. तसेच जमिनी अधिग्रहण करण्यात आली नसताना रस्त्याची रुंदी का वाढवत आहात, असा जाब विचारला. सर्व्हे क्र. 63, 66, 67 तसेच 67 ए. बी. सी. या जमिनीसह इतर जमिनी दोन्ही बाजूनी मोठ्याप्रमाणात रस्त्यात जाणार आहेत. आम्हा शेतकऱ्याना कोणतीही सूचना न देता अथवा नुकसानभरपाई न देता रस्त्याचे काम कोणत्या आधारे हाती घेण्यात आले आहे, असा जाब शेतकऱ्यांनी विचारला. संपूर्ण रस्त्याचा आराखडा दाखवा, जमीन अधिकृत अधिग्रहण करा, त्यानंतरच रस्त्याच्या कामाला सुरवात करा, अन्यथा रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यास देणार नसल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात दाद मागू!
याबाबत शेतकरी राहूल सावंत ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, यापूर्वीही रस्ता वाढवताना कोणतीही सूचना न देता वाढवलेला आहे. त्यावेळी आम्ही गावचा विचार करून मोठे आर्थिक नुकसान सहन केले आहे. मात्र जेंव्हा शहरातील रस्त्याचे दुपदरीकरण झाले. तेंव्हा मऱ्याम्मा मंदिरापासून नदीपर्यंत रुंदीकरण करण्यात आले. मात्र आराखड्यानुसार रुंदीकरण न करता फक्त हेस्कॉम कार्यालयापासून नदीपर्यंत मात्र रुंद करण्यात आला आहे. पुन्हा आता रस्ता याच भागात वाढवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी एका बाजूला दहा मीटर प्रमाणे दोन्ही बाजूला 20 मीटर रस्ता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणार आहे. जर रस्ता संपूर्ण वाढवणार असल्यास योग्यप्रकारे नियोजन करावे, आणि आमच्या जमिनी अधिकृत अधिग्रहण कराव्यात. आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्यानंतरच रस्ता रुंद करण्यात यावा, जर सार्वजनिक बांधकाम खात्याने या बाबी पूर्ण न केल्यास आम्ही सर्व शेतकरी न्यायालयात दाद मागणार आहोत, असे सांगितले.