महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांकडून पुन्हा हलगा-मच्छे बायपासला विरोध

11:11 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रणरणत्या उन्हात लहान मुलांसह आंदोलन : कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाहीची घोषणा

Advertisement

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी गेली दहा वर्षे त्या रस्त्याला विरोध दर्शविला आहे. तरीदेखील हा रस्ता केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन केले. बुधवारीही हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर रणरणत्या उन्हामध्ये लहान मुलांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, अशा घोषणा दिल्या जात होत्या. तहान, भूक हरवून बळीराजा शेतीतून उत्पन्न घेतो. यावर आपले कुटुंब सांभाळतो. वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आईच्या प्रेमाप्रमाणेच त्या जमिनीवर देखील बळीराजा प्रेम करतो. मात्र जमीन हिसकावून घेत असतील तर शेतकरी  हताश होतो. मात्र या शेतकऱ्याची तळमळ कोणालाच कळत नाही. हे पुन्हा एकदा हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या आंदोलनावरून दिसून आले. रणरणत्या उन्हामध्ये लहान मुलांसह शेतकरी या रस्त्यावर आंदोलन करत होते. आम्हाला न्याय द्या, असे म्हणून ते घोषणा देत होते. उन्हामध्ये चाललेली त्यांची धडपड पाहून साऱ्यांनाच सहानुभूती येत होती.

Advertisement

हलगा-मच्छे बायपास रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले होते. याबाबत वृत्तपत्रातून नोटिफिकेशन देण्यात आले. नोटिफिकेशन देताना झिरो पॉईंट ते मच्छे असा उल्लेख करण्यात आला. याचबरोबर त्या नोटिफिकेशनमध्ये रस्त्याचे रुंदीकरण असे देखील म्हटले होते. त्यामुळे हा रस्ता फिश मार्केटपासून मच्छेपर्यंत झाला पाहिजे होता. पण तसे न होता चक्क अलारवाड क्रॉसपासून मच्छे रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रयत्न सुरू केले. झिरो पाईंट हा फिशमार्केटमध्ये येत असेल तर अलारवाड क्रॉसपासून रस्ता कसा? असा शेतकऱ्यांनी प्रश्न केला. झिरो पॉईंटवरून न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. मात्र न्यायालयामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिशाभूल करणारे म्हणणे मांडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप आता शेतकरी करत आहेत. न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असूनही दडपशाही करत हा रस्ता पूर्ण केला जात आहे, असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगून त्याविरोधात जोरदार आवाज उठविला. सदर जमीन सुपीक असून अशी जमीन तालुक्यामध्ये इतरत्र कोठेही नाही. त्यामुळे आम्ही या जमिनीतून रस्त्याला विरोध करत असल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनाच्या दडपशाहीसमोर आम्ही कमी पडलो

मच्छे गावाजवळ माझी तीन एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये ऊस व भाजीपाला ही पिके आम्ही घेत असतो. मात्र आता या जमिनीच्या मधोमधच हा रस्ता गेल्याने आम्हाला समस्या निर्माण झाली आहे. एकूण दीड एकर जमीन रस्त्यामध्ये गेली आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड एकर जमीन शिल्लक आहे. त्यामुळे पीक घेणे अवघड होणार आहे. आम्ही पुरेपूर लढाई लढलो. मात्र प्रशासनाच्या दडपशाहीसमोर आम्ही कमी पडलो.

- अनिलकुमार अनगोळकर

पूर्ण जमीन रस्त्यामध्ये गेल्याने कुटुंब उघड्यावर

केवळ एक एकर जमीन आपली आहे. ती पूर्ण जमीन या रस्त्यामध्ये गेली. यामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या जमिनीतून पिके घेऊन आम्ही उदरनिर्वाह करत होतो. मात्र आता जमीन गेल्याने जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेकायदेशीरपणे रस्ता करणाऱ्या या प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत असल्याचे सांगितले.

 - भैरू भरमाण्णा कंग्राळकर

आमचे कुटुंब तणावाखाली

वडिलोपार्जित केवळ अर्धा एकर जमीन आहे. ती जमीन रस्त्यात गेली. त्यामुळे यापुढे आम्हाला सर्वच अन्नधान्य विकत आणावे लागणार आहे. अर्धा एकरमध्ये भातपीक, कडधान्य घेत होतो. त्यामुळे मोठा दिलासा मिळत होता. गेल्या अनेक वर्षांपासून ही जमीन रस्त्यामध्ये जाणार म्हणून आमचे कुटुंब तणावाखाली आहे. आता जमीनच गेली. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- महेश विष्णू चतुर

आता 6 गुंठ्यांमध्ये काय पिकवायचे?

शेतामध्ये काम करण्यातच आपले आयुष्य खर्ची गेले. 41 गुंठे जमीन होती. ती सर्व जमीन या रस्त्यामध्ये जाणार आहे. केवळ सहा गुंठे जमीन शिल्लक राहण्याची शक्यता आहे. आता 6 गुंठ्यांमध्ये काय पिकवायचे? असा प्रश्न पडला आहे. सुपीक जमीनच नाहीशी झाल्याने आम्ही भूमीहीन झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

- सुमन यल्लाप्पा टपाले

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article