काजू पिक विम्याची भरपाई आम्हाला द्या ; कारणे नकोत
माडखोल पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल
सावंतवाडी | प्रतिनिधी
काजू पिक विमाची भरपाई आम्हाला का नाही. आम्ही माडखोल हवामान खात्याचे स्वयंचलित केंद्र निवडले हा आमचा दोष आहे का ? मात्र आंबोली तसेच सावंतवाडी आधी हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्रातील पिक विमा काजू लाभार्थ्यांना भरपाई मिळते मग आम्हालाच का नाही असा सवाल आज माडखोल ,शिरशिंगे ,कलंबिस्त ,ओवळीये , वेर्ले , कारिवडे या गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आमची ही गावे माडखोल हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्राशी जोडली गेली आहेत. ती रद्द करावीत . आम्हाला काजू पिक विमाची भरपाई द्या आम्हाला तुमची कारण नकोत असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित कंपनी व कृषी अधिकाऱ्यांना तुम्ही कारणे सांगू नका . या शेतकऱ्यांची पिक विमा भरपाई कशी देता येईल या दृष्टीने लक्ष घाला अशा सूचनाही केल्या. येत्या सोमवार पर्यंत या काजू पीक विमा बाबत कोणताही निर्णय न झाल्यास आम्ही प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला . माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी असलेल्या सावंतवाडी भाजप विधानसभा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार मा.श्री.राजन तेली ,तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, तसेच विमा कंपनीचे अधिकारी तसेच भाजपचे जिल्हा पदाधिकारी मनोज नाईक, आनंद नेवगी , राजन राऊळ,पप्पू परब,सदाशिव पाटील , दादा परब ,संजय राऊळ अशोक राऊळ, माजी सरपंच बाळू सावंत, माजी सरपंच विनायक सावंत ,सुरेश शिर्के ,गणपत राणे ,अंतोन रॉड्रिक्स, हनुमंत पास्ते ,उदय सावंत ,चंद्रकांत सावंत आणि शेतकरी ,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी आम्ही प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडू असा इशारा दिला. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी या भागातील लोकांना कुठल्याही परिस्थितीत काजू पीक विमा भरपाई मिळायला हवी असे सुचित करून पुणे येथील कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना शेतकऱ्यांनी निवेदनही दिले