हुबळी हेस्कॉम कार्यालयावर रयतचा मोर्चा
वार्ताहर/कोगनोळी
शेतकऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकालात काढण्यासाठी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिल्यानंतर मोर्चा आणि आंदोलन मागे घेण्यात आले. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटने ऊस जळत आहेत. त्या उसाला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी 12 तास वीज मिळावी. अथणी, कागवाड, चिक्कोडी भागातील शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे विनाकारण 30 कोटी रुपये बिल आले आहे ते बिल माफ झाले पाहिजे. अन्यथा भविष्यात रयत संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या. शेतकऱ्यांना 10 तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रयत संघटनेने आंदोलन मागे घेतले.