महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना फटका

10:55 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्षभरातील मेहनत-खते-मजुरी शेतकऱ्यांच्या अंगलट : रोगाचाही प्रादुर्भाव

Advertisement

वार्ताहर/येळ्ळूर

Advertisement

शेती म्हणजे पावसातील जुगार या म्हणीनुसार परतीचा पाऊस शेतकऱ्यांचा डाव उधळतो आहे. सुरुवातीला पेरणी चांगली झाली पण सततच्या महिनाभराच्या पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली आणि दुबार लावणीचा प्रसंग शेतकऱ्यांवर गुदरला. त्यातून सावतो न सावरतो तोच पूरस्थिती निर्माण होवून पिके पाण्याखाली गेली आणि कुजली. वर्षभराची मेहनत, खते आणि मजुरी त्यांच्या अंगलट आली.

दुबार लावणी, खतांची मात्रा, औषध फवारणी करून त्यातूनही जिद्दी शेतकऱ्यांनी पिके सुधारुन घेतली. हिरवीगार डोलणारी पिके बघून शेतकऱ्यांना धीर आला. कष्टाचे चीज झाले असे वाटले, तोच ऐन भरातील पिकांवर रोगाने हल्ला चढवला. उन पावसाची तमा न बाळगता पुन्हा औषध फवारणी करून रोगावर मात करण्याचा प्रयत्न केला. थोडेफार यशही आले. पण ऐन पोसवणीच्यावेळी मावा रोगाच्या कचाट्यात सापडलेले पीक भुईसपाट होण्याची वेळ आली. त्यावर थोडी का होईना मात करत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला घास आला. निदान 60 ते 70 टक्के पीक तरी हाताशी येईल या आशेवरच त्याने गणेशोत्सव साजरा केला आणि सीमोल्लंघनाची वाट बघू लागला. एवढे टक्केटोणपे खाऊनही शेतकरी त्यातूनही उभारी घेतोय हे बघताच नियतीने आणखी एक फासा टाकला आणि परतीच्या पावसाने हाहाकार माजवला.

आज उरलीसुरली पिके काढण्याच्या स्थितीत आहेत. त्यात 90 ते 120 दिवसांची पिके पूर्ण तयार झाली असताना परतीच्या पावसाने ती भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. वेगवान वाऱ्यामुळे कांही पिके जमिनीला टेकल्यामुळे ती भरणार नाहीत. जी उभी आहेत, प्रामुख्याने बासमतीसारखी भातपिके चार, आठ दिवसांत कापणीला आली आहेत. दसरा सरताच सुगीला सुरुवात करावी या विचारात असणारा शेतकरीवर्ग मात्र परतीच्या सततच्या पावसाने हैराण झाला असून ‘नको आता पाऊस’ असे त्याने नवदुर्गाकडे गाऱ्हाणे घातले आहे.

भाजून पोळून झाल्यावर जे पीक शेतकऱ्यांच्या हाती येते, त्याचा भाव ठरवण्याचा अधिकारही त्याच्याकडे नाही. ही शेतकऱ्यांची खरी शोकांतिका आहे. खते, औषधे, मजुरी, वाहतूक यांच्या किंमती वर्षागणिक वाढतात. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचा भाव वर्षानुवर्षे तोच आहे. त्यांच्या घामाचे पैसे जोपर्यंत त्याला मिळत नाहीत, तोपर्यंत शेतकरी जरी राजा असला तरी तो मात्र या नियतीच्या आणि पावसाच्या जुगारात हरतोच आहे.अशी स्थिती ग्रामीण भागात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article