गव्याच्या हल्ल्यात गवाळी येथील शेतकरी गंभीर
खानापूर : तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गवाळी येथील शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय 55) याच्यावर गुरुवारी सकाळी 11 वाजता गव्याने अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने खानापूर सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रकाश गुरव आणि त्यांची पत्नी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जात होते. पाय वाटेने शेताकडे जाताना झुडपातून अचानक गव्याने प्रकाश यांच्यावर हल्ला केला. व शिंगाने उचलून त्यांना बाजूला फेकून दिले. यात कंबरेपासून शिंग घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पत्नीने आरडाओरड करून गव्याला हुसकावून लावले. आणि गावात येऊन गव्याने हल्ला केल्याची माहिती दिली.
गवाळी ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी प्रकाश यांना खानापूर रुग्णालयात नेले. याची माहिती वनखात्यासह पोलीस खात्यालाही दिली. भीमगड अभयारण्याचे वनाधिकारी एन. डी. नदाफ यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस केली. तसेच त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव बिम्स हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. प्रकाश यांचा संपूर्ण वैद्यकीय उपचार वनखाते करणार असल्याचे नदाफ यांनी सांगितले. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली. एएसआय बडिगेर व हवालदार मंजुनाथ मुसळी यांनी प्रकाश यांच्याकडून माहिती घेतली. भीमगड अभयारण्य क्षेत्रात तसेच तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील जंगल पट्ट्यात वन्य प्राण्यांकडून मानवावर वारंवार हल्ले होत आहेत. मात्र वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.