पूरबाधित क्षेत्रातील ऊस स्वखर्चाने तोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
कोल्हापूर :
शाहूवाडी तालुक्यातील वारणा व कडवी नद्यांच्या महापुरामुळे बाधित झालेला ऊस तोडण्यास ऊस तोडणी कामगारांनी उदासिनता दाखवल्याने शेतकऱ्यांना अशा पूरबाधित क्षेत्रातील ऊसाची शेतमजुरांकडुन स्वखर्चाने तोडणी करावी लागत असल्याचे चित्र या दोन्ही नद्यांकाठाशेजारी दिसून येत आहे. त्यामुळे आधीच महापुराने संकटात सापडलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना या ऊस तोडणी खर्चाचा आर्थिक भार सोसावा लागत आहे.
पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे वारणा व कडवी नदीकाठच्या ऊस शेतीचे प्रचंड नुकसान झाले. चिखलाने माखलेल्या या उसाची अवस्था जळणासाठी वापरण्यात येणाऱ्या दांडक्यासारखी झाली आहे. त्याचा पाला व वाडे पूर्णपणे करपून गेल्याने अशा उसापासून वाड्याची वैरणही मिळत नाही. त्यामुळे सध्या ऊस तोडणी हंगामामध्ये पूरबाधित क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी साखर कारखान्यांच्या स्थानिक ऊस तोडणी कामगारांकडून उदासिनता दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, उस तोडणीची प्रतिक्षा करून थकलेल्या शेतकऱ्यांना पूरबाधित क्षेत्रातील ऊस मजूराक्ंाढडून स्वत: तोडून देण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने सध्या नदीकाठचे अनेक शेतकरी स्वखर्चाने पूरबाधित क्षेत्रातील ऊस स्वत:हून तोडून कारखान्यास पाठवू लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा पूरबाधित क्षेत्रातील ऊस गळीतास जाऊन शेत मोकळे झाले तर पुढील हंगामातील एखादे पीक घेता येईल, या विचाराने शेतकरी पदरमोड करत आहे. महापुराच्या फटक्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना स्वखर्चाने ऊस तोडणीचा हा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. परिणामी बुडत्याचा पाय खोलात, अशी अवस्था सध्या नदीकाठच्या या पूरग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे.
उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त
महापुराने बाधित झालेल्या उसाच्या वजनात कमालीची घट झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम ऊस उत्पादनावर होऊन नदीकाठच्या ऊस शेतीमधून मिळणाऱ्या उत्पनापेक्षा उत्पादन खर्च दुप्पट झाला असल्याचे पूरग्रस्त शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पुढील काळात नदीकाठच्या शेतांमध्ये ऊस शेती करणे हा एक प्रकारे जुगारच ठरणार आहे.