For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदा भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

12:27 PM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
कांदा भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Advertisement

अतिवृष्टीचा परिणाम : उत्पादनात घट : जिल्ह्यात 3,310 हेक्टर क्षेत्रात नुकसान

Advertisement

बेळगाव : यंदा चांगला भाव मिळेल या उद्देशाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे भाववाढ झाली नसल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. अतिवृष्टी व उत्पादन कमी झाल्याने यंदा शेतकऱ्यांना कांद्याला अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही. यंदा जिल्ह्यात 7,500 हेक्टर क्षेत्रात कांदा पीक घेण्यात आले आहे. चालू वर्षात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली होती. मात्र यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात 7,500 हेक्टरपैकी 3310 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. फलोत्पादन खात्याने पीक नुकसानीचा सर्व्हे करून विशेष अहवाल तयार करत सरकारकडे पाठविला आहे. मुख्यमंत्र्यांकडून नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.

गेल्यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. यावर्षीही योग्य दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले होते. मात्र सुरुवातीच्या काळात कांदा पीक जोमात आले होते. अतिवृष्टीचा फटका बसल्याने काही प्रमाणात पिके खराब झाली.  यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित पिकांची कापणी करून घ्यावी लागली. परिणामी उत्पादन कमी झाल्याने व अतिवृष्टीमुळे कांद्याला म्हणावा तसा भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात पिकांची हानी झाली. पिके टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रतिएकर हजारो रुपये खर्च करण्यात आले. बाजारात 25 ते 40 रुपये प्रतिकिलो असलेला भाव एपीएमसी कांदा बाजारात 200 ते 1200 रुपये क्विंटलप्रमाणे विकला जात आहे. यामुळे कांदा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशा आली. परिणामी पिकासाठी खर्च केलेली रक्कमही हाताशी लागली नाही. राज्य सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.