Solapur : शेतकऱ्यांची दिवाळी झाली उधारवारी अन् उसनवारीवरच !
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप निधी नाही
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे सुमारे सहा लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाकडून सुमारे ७५० कोटी रुपयांचा मदत निधीही मंजूर करण्यात आला. दिवाळीपूर्वी मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असेही आश्वासन शासनाकडून देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात दिवाळी सण सरला तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा न झाल्याने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी उसनवारी व उधारवारीवरच गेली.
दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर संकट आले. मात्र, यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले. या संकटात राज्य शासनाकडून मदतही जाहीर करण्यात आली आहे. मात्र ती सणासुदीच्या काळात न आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा जेमतेम ठरली गेली.
राज्य शासनाकडून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतनिधी मंजूर करण्यात आला. याबाबत शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे सोमवार, २० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांची होती. या दिवशी सर्व शेतकरी मोबाईलवर मेसेज कधी येतोय याचीच प्रतीक्षा करीत होते.
मात्र या दिवशी शेतकऱ्यांना मदतनिधी मिळाला नाही. त्यानंतर २१ व २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी सुट्टीनिमित्त शासकीय व बँकेचे काम बंद होते. त्यामुळे २३ ऑक्टोबर रोजी तरी पैसे येतील, अशी अपेक्षा होती. २४ ऑक्टोबर रोजीही पैसे न आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट नाराजी दिसून येत आहे.
दिवाळी सणापूर्वी मदतनिधी देण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीची खरेदी केली नाही. मात्र सण सुरू झाला तरीही बँकेच्या खात्यात पैसे न आल्याने मात्र अनेक शेतकऱ्यांनी शेवटी उघारवारी व उसनवारीचा पर्याय स्वीकारला. काही शेतकऱ्यांनी तर थेट सावकारच गाढून कर्ज काढले.
प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्न ठरले अपयशी
राज्य शासनाकडून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे सुट्टीचे दिवस असतानाही महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची यादी बनवविण्यात व्यस्त होते. प्रशासनाकडून आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात आले. मात्र, शासनाकडून वेळेत निधी न आल्याने प्रशासकीय यंत्रणेचे प्रयत्नही अपयशी ठरले गेले